YouTube ची मोठी घोषणा! आता दिसणार नाही डिसलाईक काऊंटर; कंपनीने सांगितले कारण
By सिद्धेश जाधव | Published: November 11, 2021 07:47 PM2021-11-11T19:47:01+5:302021-11-11T19:48:10+5:30
YouTube ने डिसलाईक काउंटर लपवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लोकांना एखाद्या व्हिडीओवर किती डिसलाईक आहेत त्या दिसणार नाहीत.
YouTube ने एक मोठी घोषणा केली आहे. कंपनीने व्हिडीओवरील Dislike काऊंट लपवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कन्टेन्ट क्रिएटर्सवर चांगला परिणाम होईल असे कंपनीने सांगितले आहे. आता या निर्णयामुळे लोकांना कोणत्याही व्हिडीओवर Dislike काऊंट दिसणार नाही. नेटीजन्सनी मात्र यावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Dislike बटन लपवल्यावर क्रिएटर्सचा त्रास कमी होईल आणि ‘डिसलाईक अटॅक’ कमी होतील, असे युट्युबला वाटते. विशेष म्हणजे या निर्णयानंतर देखील प्रत्येक YouTube व्हिडीओवर लाईक आणि डिसलाईक बटन दिसेल. परंतु किती लोकांनी व्हिडीओ डिसलाईक केला आहे, हे मात्र आता सर्वांना दिसणार नाही.
डिसलाईकची संख्या व्हिडीओ अपलोड करणाऱ्या क्रिएटरला दिसेल. युजर्स आधीप्रमाणे न आवडलेल व्हिडीओ Dislike करू शकतील. तर यूट्यूब क्रिएटर्सना YouTube स्टूडियोमध्ये व्हिडीओ परफॉर्मन्स सोबतच डिसलाईक काउंट दिसेल. हा निर्णय क्रिएटर्सना होणारा मानसिक त्रास कमी होण्यासाठी घेण्यात आला आहे.
असा निर्णय घेणारा युट्युब हा पहिला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म नाही. याआधी ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्रामवर देखील असा बदल दिसला होता. युट्युबने या नव्या बदलाची चाचणी देखील केली आहे. या निर्णयामुळे नव्या क्रिएटर्सना सुरुवात करण्यासाठी धीर मिळेल. डिसलाईक अटॅकमुळे मनोबल कमी होणार नाही, असे या कंपनीला वाटते आहे.