मी यूट्युबर: कोकण समजावणारा इंजिनीअर
By बाळकृष्ण परब | Published: November 6, 2022 10:10 AM2022-11-06T10:10:54+5:302022-11-06T10:11:04+5:30
आपल्या कोकणाला निसर्गसौंदर्याची दैवी देणगी लाभली आहे. येथील स्वच्छ आणि सुंदर समुद्र किनारे आणि सह्याद्रीतील घनदाट वने मन मोहून टाकणारी आहेत.
आपल्या कोकणाला निसर्गसौंदर्याची दैवी देणगी लाभली आहे. येथील स्वच्छ आणि सुंदर समुद्र किनारे आणि सह्याद्रीतील घनदाट वने मन मोहून टाकणारी आहेत. अशा या समृद्ध कोकणाकडे गेल्या काही वर्षांपासून पर्यटकांची पावले मोठ्या प्रमाणावर वळू लागली आहेत. मात्र तळकोकणात पर्यटनाचा फारसा विकास अद्याप झालेला नसल्याने इथे येणारे पर्यटक ठरावीक बिचेस आणि काही धार्मिक स्थळांपुरते मर्यादित राहतात. मात्र अद्याप प्रकाशझोतात न आलेली कोकणातील पर्यटनस्थळे, तेथील जीवनशैली, शेती, बागायती यांची माहिती एक तरुण कोकणी रानमाणूस या यूट्युब चॅनलच्या माध्यमातून करून देत आहे. त्याचं नाव आहे प्रसाद गावडे.
प्रसाद हा मुळचा इंजिनियर. मात्र त्याने शहरात मोठ्या पगाराच्या नोकरीची कास न धरता कोकणातील गावात शाश्वत विकास आणि इकोटुरिझमच्या माध्यमातून स्वयंरोजगाराची वाट धरली. कोकणातील पर्यावरण आणि पर्यटनाबाबत कधीही समोर न आलेली माहिती देणारा त्याचा कोकणी रानमाणूस हा त्याचा यूट्युब चॅनल अल्पावधीतच लोकप्रिय झाला. सोबतच कोकणाची माहिती देणारा रानमाणूस ही त्याची ओळख बनली. आज त्याच्या कोकणी रानमाणूस ह्या यूट्युब चॅनेलचे तब्बल दोन लाखांहून अधिक सब्स्क्रायबर्स आहेत.
निसर्ग समृद्ध असलेल्या कोकणातील न पाहिलेल्या पर्यटनस्थळांची माहिती देतानाच तेथील पर्यावरण संवर्धनाविषयी प्रसाद आग्रही आहे. कोकणाच्या पर्यावरणाला हानिकारक ठरतील, अशा गोष्टींबाबतही तो आवाज उठवत असतो. कोकणातील पारंपरिक लोकजीवन, शेती, बागायती, मासेमारी यांची माहिती तो त्याच्या यूट्युब चॅनलच्या माध्यमातून देत असतो. एवढंच नाही तर इको टुरिझमच्या माध्यमातून तो पर्यटकांना कोकणी लोकजीवनाचा प्रत्यक्ष अनुभव मिळवून देत आहे. त्याबाबतची त्याची मांगर फार्म स्टे ही संकल्पना चांगलीच लोकप्रिय झालेली आहे.
कोकणी रानमाणूस आणि कोकणातील इकोटुरिझमबाबत प्रसाद सांगतो की, माणूस निसर्गाधारीत जीवनशैलीत एक समाधानी आणि शाश्वत जीवनपद्धती जगू शकतो पण ह्या जगण्यातला स्वर्गीय आनंद त्याला कळायला हवा. आम्ही पर्यटकांना शेतकऱ्यांसोबत जोडून देऊन त्यांच्या शेतातूनच कोकणी मेवा खरेदी करता येईल आणि मांगर फार्मस्टे या मातीच्या कौलारू शेत घरात राहून कोकणी जीवन सुद्धा अनुभवता येईल अशी ह्या मागची संकलपना आहे.