यू-ट्युबवर झक्कास पावभाजी अन् ‘आपली आजी’!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2022 10:50 AM2022-08-07T10:50:51+5:302022-08-07T10:50:58+5:30
लग्न झाल्यानंतर सासूच्या देखरेखीखाली आजी रुचकर स्वयंपाक करायला शिकली.
- प्रवीण मरगळे
यू-ट्युबवर यंग, एनर्जिटिक यू-ट्युबर्सची चर्चा होते. परंतु, सत्तरीच्या एका आजीनं भल्याभल्यांना तोंडात बोटं घालायला लावलीत. शाळेची पायरीही न चढलेली ही आजी एकापेक्षा एक रेसिपी दाखवून स्टार यू-ट्युबर ठरली आहे. तिचं नाव आहे सुमन धामणे. अहमदनगरच्या सारोळा कासार गावातील आजीला सगळेच ‘आपली आजी’ मानू लागलेत.
लग्न झाल्यानंतर सासूच्या देखरेखीखाली आजी रुचकर स्वयंपाक करायला शिकली. आजीचा नातू यश याने या कलेला लोकांसमोर आणायचं ठरवलं. एकेदिवशी यशनं आजीला पावभाजी करायला सांगितली. आजीनं स्वत:च्या काही ट्रिक्स आणि टिप्स वापरून पावभाजीची रेसिपी तयार केली. ती नातवाला आणि घरच्यांना खूप आवडली. त्यातून यशला एक कल्पना सुचली आणि सुरू झालं ‘आपली आजी’ हे यू-ट्यूब चॅनेल.
सुरुवातीला मोबाईलवरून व्हिडिओ रेकॉर्ड करून पोस्ट केला. तो हळूहळू खूप व्हायरल झाला. त्याला १ लाख व्ह्यूज मिळाले. चॅनलनं लॉकडाऊनमध्ये टॉप गिअर टाकला आणि आज ‘आपली आजी’ या चॅनेलचे १४ लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत. व्हिडिओ व्ह्यूज १८,८२,५४,२५५ इतके आहेत. झुणका-भाकरीपासून ते केकपर्यंत नाना पदार्थ आजीने बनवले आहेत.
आजीबाईंमुळे ११ जणांना रोजगार मिळाला आहे. आजीच्या रेसिपी लोकांमध्ये कुतूहलाचा विषय ठरल्या. मग, आजी कुठले मसाले वापरते, अशी विचारणा सुरू झाली. सुरुवातीला त्याची कमेंट्समधूनच उत्तरं दिली गेली आणि पुढे ‘आपली आजी’ मसाल्याचा व्यवसाय उभा राहिला. हे ‘मसालेदार’ यश प्रेरणादायी आहे.