Zomato आणि Swiggy ला गुगलकडून नोटीस, नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप
By ravalnath.patil | Published: October 1, 2020 01:22 PM2020-10-01T13:22:12+5:302020-10-01T13:37:48+5:30
Zomato, Swiggy get notices from Google for violating Play Store norms : झोमॅटो आणि स्विगी कंपनीच्या आधी गुगलने डिजिटल पेमेंट कंपनी पेटीएमवर कारवाई करत आपल्या प्ले स्टोअरमधून हटविले होते.
नवी दिल्ली : फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटो आणि स्विगीलागुगलने नोटीस पाठविली आहे. या दोन्ही कंपन्यांनी प्ले स्टोअरच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे गुगलचे म्हणणे आहे. याशिवाय, गुगलने दोन्ही कंपन्यांना आपल्या अॅपमध्ये नवीन फीचर अॅड करण्यास सांगितले आहे.
झोमॅटो आणि स्विगी कंपनीच्या आधी गुगलने डिजिटल पेमेंट कंपनी पेटीएमवर कारवाई करत आपल्या प्ले स्टोअरमधून हटविले होते. गेल्या काही दिवसांपूर्वी म्हणजेच 18 सप्टेंबर रोजी गुगलने आपल्या प्ले स्टोअरवरून डिजिटल पेमेंट कंपनी पेटीएमचे अॅप हटविले होते. गुगलने पेटीएमवर स्पोर्ट्स बेटिंग अॅक्टिव्हिटी पॉलिसीचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. मात्र, यानंतर काही तासांनी पुन्हा गुगलच्या प्ले स्टोअरमध्ये पेटीएम सक्रीय झाल्याचे दिसून आले.
नोटीस अयोग्य असल्याचे झोमॅटो प्रवक्त्याने सांगितले
गुगलने आम्हाला नोटीस पाठवली आहे. पण ही पूर्णपणे अयोग्य नोटीस आहे, असे झोमॅटोच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. तसेच, ही नोटीस पूर्णपणे अन्यायकारक आहे. परंतु आम्ही काय करू शकतो. आमची एक छोटी कंपनी आहोत आणि आम्ही गुगलच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आमचा व्यवसाय करीत आहोत, असे प्रवक्त्याने सांगितले. याशिवाय, कंपनीने असेही म्हटले आहे की, गुगलने झोमॅटो प्रीमियर लीगचे फीचर बदलण्यास सांगितले आहे असून आम्ही त्यावर काम करीत आहोत.
याबाबत स्विगीकडून कोणतीही प्रतिक्रिया नाही
स्विगीकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. कंपनीने आपल्या अॅपमधील फीचर थांबविले आहे. तसेच, याविषयी गुगलसोबत चर्चा सुरु आहे. गुगलने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. बर्याच कंपन्यांना सध्याच्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) संधीचा फायदा करायचा आहे. अशा परिस्थितीत, कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि विक्री वाढविण्यासाठी आपल्या अॅपमध्ये खेळासंबंधी फीचर अॅड करत आहेत.
गुगलने पेटीएम अॅप दुपारी हटवले, संध्याकाळी रिस्टोअर केले
गुगलने पेटीएम हटवल्यानंतर डिजिटल पेमेंट सिस्टिममध्ये मोठा वाटा असलेले हे अॅप वापरणारे लाखो लोक दिवसभर गोंधळात सापडले होते. ऑनलाइन कसिनोचे आणि अवैध जुगार खेळांमध्ये पैसे टाकण्याची सुविधा दिली जात असेल तर ते नियमांचे उल्लंघन आहे, असे स्पष्ट करीत गुगल प्ले-स्टोअरवरून पेटीएम अॅप काढून टाकले होते. मात्र, सायंकाळी पुन्हा हे अॅप डाउनलोड आणि अपडेट्ससाठी उपलब्ध झाले आहे. त्यामुळे दिवसभर चाललेला पेटीएमचा गोंधळ अखेर सायंकाळी मिटला होता.
गुगल प्ले-स्टोअरची पॉलिसी काय?
पेटीएम अॅप हटवल्यानंतर गुगलने म्हटले होते की, आम्ही ऑनलाइन कॅसिनो किंवा कोणत्याही नियमनाविरोधातील जुगार खेळांना समर्थन देत नाही. कोणत्याही अॅपच्या माध्यमातून बाहेरच्या वेबसाइटलाही पैशाच्या माध्यमातून जुगार खेळण्याची परवानगी देण्यात असेल किंवा जिंकणाऱ्याला पैसे/रोख बक्षिसे दिली जात असतील, तर ते नियमांचे उल्लंघन आहे. जर कोणी नियमांचे उल्लंघन करत असेल तर त्या अॅप डेव्हलपरला तशी सूचना दिली जाते आणि जोवर संबंधित अॅप प्ले-स्टोअरच्या नियमात न बसण्या-या गोष्टी काढत नाही तोवर ते अॅप प्ले-स्टोअरवरून काढले जाते.