ॲन्डी मरेने दिले निवृत्तीचे संकेत; विजयानंतर म्हणाला, काहीच महिने शिल्लक!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 05:54 AM2024-02-28T05:54:07+5:302024-02-28T05:54:20+5:30
मरेने पहिला सेट गमावल्यानंतर मुसंडी मारताना शापोवालोवचा ४-६, ७-६ (५), ६-३ असा पराभव करीत हार्ड कोर्टवर ५००वा विजय साजरा केला.
दुबई : ब्रिटनचा टेनिसपटू आणि तीनवेळेचा ग्रॅन्डस्लॅम चॅम्पियन ॲन्डी मरे याने आंतरराष्ट्रीय टेनिसमधून निवृत्त होण्याचे संकेत दिले आहेत. दुबई ओपन टेनिसच्या पहिल्या फेरीत सोमवारी तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत डेनिस शापोवालोवला नमविल्यानंतर, ‘आता माझ्या कारकिर्दीतील अखेरचे काहीच महिने शिल्लक आहेत’, असे हा दिग्गज खेळाडू म्हणाला.
मरेने पहिला सेट गमावल्यानंतर मुसंडी मारताना शापोवालोवचा ४-६, ७-६ (५), ६-३ असा पराभव करीत हार्ड कोर्टवर ५००वा विजय साजरा केला. पहिल्या फेरीतील विजयानंतर तो म्हणाला, ‘खरेतर मला अद्याप प्रतिस्पर्धा करणे आवडते. मी अद्याप या खेळावर जिवापाड प्रेम करतो. पण, वाढत्या वयानुसार युवा खेळाडूंसोबत स्पर्धा करणे, त्यासाठी शारीरिक तंदुरुस्ती राखणे, स्वत:ला फिट ठेवणे कठीण जाते. माझ्याकडे आता अधिक वेळ शिल्लक राहिलेला नाही. पण, अखेरच्या काही महिन्यांत जितके शक्य असेल तितक्या दमदार खेळाचा मी प्रयत्न करणार आहे.’
मरेने आधीही निवृत्तीचा विचार केला होता. शापोवालोवविरुद्ध मरेचा हा वर्षातील दुसरा विजय ठरला. मरे आता पुढील फेरीत उगो हम्बर्ट आणि गेल मोनफिल्स यांच्यातील विजेत्याविरुद्ध खेळेल. ओपन युगात मरेशिवाय रॉजर फेडरर (७८३), नोवाक जोकोविच (७००), आंद्रे आगासी (५९२) आणि राफेल नदाल (५१८) यांनी हार्डकोर्टवर ५०० किंवा त्याहून अधिक विजय नोंदविले आहेत.