एटीपी चँलेंजर टेनिस : युकी भांबरी, रामकुमार रामनाथन अंतिम फेरीत, भारतीय खेळाडूंमध्ये रंगणार जेतेपदाची लढत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 01:56 AM2017-11-18T01:56:09+5:302017-11-18T01:56:20+5:30
भारताचा स्टार एकेरी टेनिसपटू युकी भांबरी आणि रामकुमार रामनाथन यांनी आपआपल्या सामन्यात बाजी मारताना एमएसएलटीए एटीपी चँलेंजर टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली.
मुंबई : भारताचा स्टार एकेरी टेनिसपटू युकी भांबरी आणि रामकुमार रामनाथन यांनी आपआपल्या सामन्यात बाजी मारताना एमएसएलटीए एटीपी चँलेंजर टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. युकीने एकतर्फी झालेल्या सामन्यात स्पेनच्या अॅड्रियन मेनेंदेझ - मॅसेरिअस याला २-० असे सहज लोळवले. दुसरीकडे रामकुमारने भारताच्याच साकेत मायनेनीचे आव्हान संपुष्टात आणले.
महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएसएलटीए) आणि पीएमडीटीए यांच्या संयुक्त विद्यमानाने पुण्यातील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सुरु असलेल्या या स्पर्धेत जागतिक क्रमवारीत १३७व्या स्थानी असलेल्या युकीने आपली विजयी घोडदौड कायम राखली. त्याने जागतिक क्रमवारीत १२७व्या स्थानी असलेल्या आणि स्पर्धेत दुसरे मानांकन लाभलेल्या अॅड्रियनचा ६-२, ६-४ असा सहजपणे धुव्वा उडवला. बॅकहँड आणि फोरहँड या फटक्याच्या जोरावर युकीने अॅड्रियनला स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला.
दुसरीकडे, भारतीयांमध्ये झालेल्या उपांत्य सामन्यात रामकुमारने आपला धडाकेबाज खेळ कायम ठेवत बलाढ्य साकेत मायनेनीचे तगडे आव्हान दोन सेटमध्ये ६-३, ६-२ असे परतावले. वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या साकेतने शानदार खेळ करताना उपांत्य फेरीपर्यंत धडक मारली. परंतु, सध्या तुफान फॉर्ममध्ये असलेल्या रामकुमारपुढे त्याचा निभाव लागला नाही.