एटीपी फायनल्स; फेड एक्सप्रेस सुसाट, दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 02:09 AM2017-11-18T02:09:37+5:302017-11-18T02:09:48+5:30
आपली गणना दिग्गज खेळाडूंमध्ये का होते हे पुन्हा एकदा सिद्ध करताना स्वित्झर्लंडचा स्टार टेनिसपटू रॉजर फेडररने पिछाडीवरुन बाजी मारताना एटीपी फायनल्सच्या उपांत्य फेरीत धडक मारली.
लंडन : आपली गणना दिग्गज खेळाडूंमध्ये का होते हे पुन्हा एकदा सिद्ध करताना स्वित्झर्लंडचा स्टार टेनिसपटू रॉजर फेडररने पिछाडीवरुन बाजी मारताना एटीपी फायनल्सच्या उपांत्य फेरीत धडक मारली. अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात फेडने पहिला सेट गमावल्यानंतर क्रोएशियाच्या मरिन सिलिचचे कडवे आव्हान २-१ असे परतावले. अन्य एका सामन्यात बाजी मारताना अमेरिकेच्या जॅक सोक याने उपांत्य फेरीत प्रवेश केला.
विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेला फेड यंदाच्या मोसमात सुसाट खेळत आहे. यंदा दोन ग्रँडस्लॅम पटकावतानाच फेड आपल्या जुन्या फॉर्ममध्ये परतला आहे. त्यामुळेच प्रतिस्पर्धी खेळाडू फेडपुढे खेळताना अडखळताना दिसत आहेत.
गेल्या काही स्पर्धांपासून चमकदार कामगिरी करत असलेल्या सिलिचने फेडविरुद्ध पहिला सेट जिंकून आश्चर्यकारक आघाडी घेतली खरी, पण ही आघाडी कायम राखण्यात त्याला यश आले नाही.
पहिला सेट टायब्रेकमध्ये गमावल्यानंतर फेडने सिलिचला टेनिसचे धडे देताना ६-७, ६-४, ६-१ असे सहज पराभूत केले. उपांत्य फेरीत फेडपुढे बेल्जियमचा डेव्हीड गॉफिन किंवा आॅस्ट्रियाचा डॉमनिक थिएम यांच्यापैकी एकाचे आव्हान असेल.
दुसरीकडे, जॅकने शानदार कामगिरी करताना गेल्या दहा वर्षांमध्ये या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहचणारा पहिला अमेरिकन खेळाडू असा मान मिळवला. याआधी २००७ साली अँडी रॉडिक याने एटीपी फायनलच्या उपांत्य फेरीत धडक मारली होती. तीन सेटपर्यंत रंगलेल्या रोमांचक लढतीत जॅकने जर्मनीच्या अलेक्झांडर ज्वेरेवचे कडवे आव्हान
६-४, १-६, ६-४ असे परतावले.