एटीपी महाराष्ट्र ओपन टेनिस : भारताच्या रामकुमार, भांब्रीचे आव्हान संपुष्टात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 01:16 AM2018-01-04T01:16:55+5:302018-01-04T01:22:50+5:30
भारताच्या युकी भांब्री आणि रामकुमार रामनाथन यांना अनुक्रमे फ्रान्सचा पिएरे ह्युजूस हर्बर्ट व मारिन सिलीचकडून पराभव पत्करावा लागल्यामुळे त्यांचे एकेरी गटात एटीपी महाराष्ट्र ओपन टेनिस स्पर्धेत दुस-या फेरीत आव्हान संपुष्टात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : भारताच्या युकी भांब्री आणि रामकुमार रामनाथन यांना अनुक्रमे फ्रान्सचा पिएरे ह्युजूस हर्बर्ट व मारिन सिलीचकडून पराभव पत्करावा लागल्यामुळे त्यांचे एकेरी गटात एटीपी महाराष्ट्र ओपन टेनिस स्पर्धेत दुस-या फेरीत आव्हान संपुष्टात आले. दुसरीकडे नेदरलँडच्या रॉबिन हासी, फ्रान्सच्या बेनॉट पैरे या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
महाराष्ट्र टेनिस संघटनेच्या वतीने म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत एकेरीत दुस-या फेरीत जागतिक क्रमवारीत ८१ व्या स्थानावर असलेल्या फ्रान्सच्या पिएरे ह्युजूस हर्बर्टने जागतिक क्रमवारीत ११८ व्या स्थानावर असलेल्या भारताच्या युकी भांब्रीचा १ तास ५० मिनिटे चाललेल्या लढतीत ६-४, ३-६, ४-६ तीन सेटमध्ये पराभव करून दिमाखात उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. चुरशीच्या झालेल्या या लढतीत युकीने पहिल्याच गेममध्ये पिएरेची सर्व्हिस रोखली. त्यानंतर दोन्ही खेळाडूंनी आपापली सर्व्हिस राखत जिगरबाज खेळाचे प्रदर्शन केले. दहाव्या गेममध्ये युकीने ४०-४० असे गुण झाले असताना दोन अफलातून फटके परतावून लावत हा सेट ६-४ असा जिंकून आघाडी घेतली. दुसºया सेटमध्ये पिएरेने अधिक आक्रमक सुरुवात केली. या सेटमध्ये पिएरेने युकीची दुसºया व चौथ्या गेममध्ये, तर युकीने पिएरेची पहिल्या, पाचव्या गेममध्ये सर्व्हिस भेदली. पण सामन्यात ५-३ अशा फरकाने आघाडीवर असताना ९ व्या गेममध्ये पिएरेने बिनतोड सर्व्हिस करत हा सेट युकीविरुद्ध ६-३ असा जिंकून सामन्यातील आपले आव्हान कायम ठेवले. तिसºया व निर्णायक सेटमध्ये पिएरेने वेगवान व चतुराईने खेळ केला. या सेटमध्ये आपले वर्चस्व कायम राखत हा सेट युकीविरुद्ध ६-४ अशा फरकाने जिंकून विजय मिळवला. भारताच्या रामकुमार रामनाथनला यूएस ओपन आणि २0१७ मध्ये विम्बल्डन स्पर्धेत अंतिम फेरीत पोहोचणाºया मारिन सिरीचकडून ४-६, ३-६ गुणांनी पराभव पत्करावा लागला.
जागतिक क्रमवारीत ४२ व्या स्थानावर असलेल्या नेदरलँडच्या रॉबिन हासी याने जागतिक क्रमवारीत ११३ व्या स्थानावर असलेल्या चिलीच्या निकोलस जेरीचा टायब्रेकमध्ये ३-६, ७-६ (५), ७-५ असा पराभव करून आगेकूच केली. हा सामना २ तास १० मिनिटे चालला. जागतिक क्र. ४१ असलेल्या फ्रान्सच्या बेनॉट पैरे याने जागतिक क्र. ८५ असलेल्या हंगेरीच्या मार्टन फॉक्सोविक्स याचा ६-४, ६-७ (४), ७-६ (६) सेटनी ३ तास २ मिनिटे चाललेल्या सामन्यात पराभव करून उपांत्यपूर्व फेरीतील आपली जागा निश्चित केली.
पहिल्या सेटमध्ये मला हवी तशी सर्व्हिस करता आली नाही, कारण मला सूर गवसला नव्हता. हुकमी सर्व्हिस हे माझे प्रमुख अस्त्र आहे. परंतु तेच निष्प्रभ ठरल्यामुळे पहिला सेट युकीला जिंकता आला. परंतु सर्व्हिस हेच माझं गुण मिळविण्याचे मुख्य साधन असल्यामुळे मी त्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आणि दुसºया सेटमध्ये यश मिळाले. त्यामुळे दुसरा सेट जिंकून सामन्यात मला १-१ अशी बरोबरी साधता आली. तरीही सामना जिंकण्याकरिता आणखी विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे हे मला जाणवत होते. त्यामुळे तिसºया सेटमध्ये मी माझी सर्व्हिस राखण्यावर भर दिला. कारण माझी खेळण्याची तीच शैली आहे. त्यातच युकीची सर्व्हिस अत्यंत मोक्याच्या क्षणी भेदण्यात मला यश मिळाले. त्यामुळे मला हा सामना जिंकता आला. युकीने या संपूर्ण सामन्यात चांगली झुंज दिली. त्यामुळे मला सर्वोत्तम खेळ करावा लागला. - पिएरे ह्युजूस हर्बर्ट
निकाल :
दुसरी फेरी : एकेरी
पिएरे ह्युजूस हर्बर्ट (फ्रांस) (८) वि.वि. युकी भांब्री (भारत) ४-६, ६-3, ६-४; बेनॉट पैरे (फ्रांस) (४) वि.वि. मार्टन फॉक्सोविक्स (हंगेरी) ६-४, ६-७ (४), ७-६ (६); रॉबिन हासी (नेदरलँड) (५) वि.वि. निकोलस जेरी (चिली) ३-६, ७-६ (५), ७-५.