एटीपी ताश्कंद ओपन : युकी भांबरीला ताश्कंद चॅलेंजरमध्ये दुहेरी यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 01:15 AM2017-10-11T01:15:39+5:302017-10-11T01:16:09+5:30
भारताचा एकेरीतील अव्वल टेनिसपटू युकी भांबरीने एटीपी ताश्कंद ओपनमध्ये एकेरीच्या दुस-या फेरीत धडक मारली असून दिवीज शरणच्या साथीने दुहेरीमध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठली.
ताश्कंद : भारताचा एकेरीतील अव्वल टेनिसपटू युकी भांबरीने एटीपी ताश्कंद ओपनमध्ये एकेरीच्या दुसºया फेरीत धडक मारली असून दिवीज शरणच्या साथीने दुहेरीमध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठली.
भांबरीने एकेरीच्या लढतीत कझाकिस्तानच्या अलेक्सांदे्र नेदोवयेसोव्हविरुद्ध ३-० ने आघाडीवर असताना अलेक्सांद्रेने दुखापतीमुळे सामन्यातून माघार घेतली. दीड लाख अमेरिकन डॉलर पुरस्कार रक्कम असलेल्या या स्पर्धेत जागतिक मानांकनामध्ये १५२ व्या स्थानावर असलेल्या भांबरीला पुढच्या फेरीत पोलंडच्या कामिल माजशर्जाकदच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. माजशर्जाकदने आॅस्ट्रेलियाच्या मार्क पोलमांसविरुद्ध ६-४, ७-६ असा संघर्षपूर्ण विजय मिळवला.
दुहेरीच्या लढतीत भांबरी व डावखुरा दिवीज यांनी अव्वल मानांकित अर्जेंटिनाची जोडी
गुइल्लेर्मो दुरान व आंद्रेस मोलतेनी यांचा पहिल्या फेरीत ६-४, ६-२ ने पराभव केला. पुढच्या फेरीत त्यांना युक्रेनच्या डेनेस मोलचानोव्ह व मोनाकोच्या रोमॅन अर्नेओदो या जोडीसोबत लढत द्यावी लागेल. स्पर्धेत चौथे मानांकन प्राप्त भारतीय जोडी जीवन नेदुंचेझियान व विष्णू वर्धन यांना इटलीच्या थॉमस फाब्बियानो व स्वित्झर्लंडच्या लुका मार्गारोली या जोडीविरुद्ध ६-७, ६-७ ने पराभव स्वीकारावा लागला.
दरम्यान, शांघाय मास्टर्समध्ये रोहन बोपन्ना व पाब्लो क्युवास या जोडीला पहिल्या फेरीत निक कर्गियोस व लुकास पोयुल्ले यांच्याविरुद्ध ६-३, ३-६, ५-१० ने पराभव स्वीकारावा लागला. (वृत्तसंस्था)
कॅनडाच्या डेनिस शापोवालोव्हविरुद्ध डेव्हिस कप स्पर्धेतील लढत माझ्या कारकिर्दीतील सर्वोत्तम लढतींपैकी एक आहे, अशी प्रतिक्रिया भारताचा अव्वल टेनिसपटू युकी भांबरीने व्यक्त केली.
डेव्हिस कप स्पर्धेत भारताला वर्चस्व गाजविण्यासाठी मानांकनामध्ये अव्वल ५० मधील खेळाडू संघात हवेत, असेही त्याने म्हटले आहे.
भांबरीला ३ तास ५२ मिनिटे रंगलेल्या मॅरेथॉन लढतीत १८ वर्षीय शापोवालोव्हविरुद्ध ६-७, ४-६, ७-६, ६-४, १-६ ने पराभव स्वीकारावा लागला होता.