एटीपी वर्ल्ड टूर टेनिस : नदाल-फेडररदरम्यान ‘ड्रीम फायनल’ची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 03:42 AM2017-11-12T03:42:51+5:302017-11-12T03:43:23+5:30
एटीपी वर्ल्ड टूर टेनिसची अंतिम फेरी राफेल नदाल व रॉजर फेडरर या दोन दिग्गज खेळाडूंमध्ये होऊ शकते. मात्र यात नदालची तंदुरुस्ती हाच मोठा अडथळा ठरु शकतो असे आयोजकांना वाटते.
लंडन : एटीपी वर्ल्ड टूर टेनिसची अंतिम फेरी राफेल नदाल व रॉजर फेडरर या दोन दिग्गज खेळाडूंमध्ये होऊ शकते. मात्र यात नदालची तंदुरुस्ती हाच मोठा अडथळा ठरु शकतो असे आयोजकांना वाटते.
हे दोन महान खेळाडू लंडनमध्ये होणा-या या स्पर्धेत अग्रमानांकित म्हणून सहभागी होणार आहेत.या दोघांनीही दोन ग्रॅँडस्लॅम जिंकले आहेत. जोकोविच व अॅँडी मरे यांना मात्र यावर्षी दुखापतीने ग्रासले आहे.
स्पर्धेत सहभागी झालेल्या आठ अग्रमानांकित खेळाडूंमध्ये २० वर्षीय अलेक्झांडर ज्वेरेव याचाही समावेश आहे. नदाल सध्या आपल्या तंदुरुस्तीवर काम करत आहे. उद्या होणा-या डेव्हिड गॉफिनविरुद्धच्या सामन्यासाठी आपण पूर्ण सरावानिशी मैदानात उतरत नसल्याचे नदालने कबूल केले आहे. मात्र आपण १०० टक्के तंदुरुस्त असल्याचे त्याने सांगितले.
नदाल म्हणाला, ‘मी जर तंदुरुस्त नसतो तर येथे खेळण्यासाठी आलोच नसतो.मी दररोज सराव करत असून या स्पर्धेची तयारी करत आहे.’ फेडररही या स्पर्धेची तयारी करत आहे. तो म्हणाला,‘ मागील वर्षी मी येथे येऊ शकलो नाही. मला या वर्षी कमी रॅँकींगपासून सरुवात करावी लागली होती.’