Australian Open 2021: राफेल नदाल पराभूत, ग्रँडस्लॅम रेकॉर्डचे स्वप्न भंगले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2021 06:08 AM2021-02-18T06:08:12+5:302021-02-18T06:08:51+5:30
Australian Open 2021: ग्रँडस्लॅमच्या २२५ सामन्यांच्या नदाल याच्या कारकीर्दीत बुधवारी दोन सेटमध्ये आघाडी घेतल्यानंतरही पराभव पत्करावा लागल्याची ही दुसरीच घटना आहे.
मेलबर्न : दिग्गज टेनिसपटू राफेल नदाल याचे २१ वे ग्रँडस्लॅमचे विजेतेपद जिंकण्याचे स्वप्न बुधवारी ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत स्टेफानोस सिटिसिपास याच्याकडून झालेल्या पराभवाने भंगले.
ग्रँडस्लॅमच्या २२५ सामन्यांच्या नदाल याच्या कारकीर्दीत बुधवारी दोन सेटमध्ये आघाडी घेतल्यानंतरही पराभव पत्करावा लागल्याची ही दुसरीच घटना आहे.
सिटिसिपास याने त्याला ३-६, २-६, ७-६, ६-४, ७-५ ने पराभूत करीत उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले. ग्रीसच्या २२ वर्षीय सिटिसिपास याची लढत आता २०१९ चा युएस ओपनचा उपविजेता दानिल मेदवेदेव याच्याशी शुक्रवारी होणार आहे.
अन्य एका उपांत्य फेरीत अव्वल मानांकित नोव्हाक जोकोविचचा सामना ११४ व्या मानांकित असलान कारत्सेवशी होईल.
सिटिसिपास आणि मेदवेदेव या दोघांनी आतापर्यंत एकदाही ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकलेली नाही, तर कारात्सेव प्रथमच ग्रँडस्लॅममध्ये खेळत आहे. रशियन टेनिसपटू मेदवेदेव याने दुखापतीनंतरही उपांत्यपूर्व फेरीत बुधवारी आपल्याच देशाच्या आंद्रेय रुबलेवला नमवत सलग १९ व्या विजयासह तिसऱ्यांदा ग्रँडस्लॅमच्या उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले.