ऑस्ट्रेलियन ओपन : जोकोविच, फेडरर सोप्या विजयासह उपांत्यपूर्व फेरीत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 05:20 AM2020-01-27T05:20:58+5:302020-01-27T05:25:02+5:30
महिला गटात जागतिक क्रमवारेत अव्वल स्थानावर असलेली ऐश्लिग बार्टी हिला देखील अखेरच्या आठ खेळाडूंमध्ये स्थान मिळविण्यात यश आले.
मेलबोर्न : सध्याचा विजेता सर्बियाचा नोवाक जोकोविच याच्यासह स्वित्झर्लंडचा दिग्गज रॉजर फेडरर यांनी ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेची रविवारी उपांत्यपूर्व फेरी गाठली. महिला गटात जागतिक क्रमवारेत अव्वल स्थानावर असलेली ऐश्लिग बार्टी हिला देखील अखेरच्या आठ खेळाडूंमध्ये स्थान मिळविण्यात यश आले.
३८ वर्षांच्या फेडररने हंगेरीचा मार्टन फुकसोविक्सयाच्याविरुद्ध पहिला सेट गमविल्यानंतर जोरदार पुनरागमन करीत ४-६,६-१, ६-२, ६-२ ने विजय मिळवून ५७ व्यांदा ग्रॅन्डस्लॅमच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. महिला गटात आॅस्ट्रेलियाची अव्वल मानांकित बार्टीने अमेरिकेची १८ वी मानांकित एलिसन रिस्केहिच्यावर ६-३,१-६, ६-४ ने मात केली. जोकोविच याने सरळ सेटमध्ये सोप्या विजयासह उपांत्यपूर्व फेरी गाठली.
सर्बियाचा दुसरा मानांकित जोकोविच याने अर्जेंटिनाचा १४ वा मानांकित दिएगो श्वार्जमॅन याच्यावर ६-३,६-४,६-४ ने मात केली. या विजयासह जोकिविच या स्पर्धेत ११ व्यांदा अव्वल आठ खेळाडूंमध्ये दाखल झाला आहे. जोकोविचला उपांत्यपूर्व सामन्यात मिलोस राओनिच याचा सामना करावा लागेल. राओनिच याने अद्याप एकही सेट गमावला नसून ३२ वे मानांकन लाभलेल्या राओनिचने आज क्रोएशियाचा मारिन सिलिच याच्यावर ६-४,६-३,७-५ ने मात केली.
ग्रॅन्डस्लॅमची ४६ व्यांदा उपांत्यपूर्व फेरी गाठणारा जोकोविच विजयानंतर म्हणाला,‘ मिलोस हा टेनिस सर्किटमध्ये सर्वांत उंच खेळाडूंपैकी एक आहे. त्याची सर्व्हिस दमदार असल्यामुळे त्याची सर्व्हिस घेण्यासाठी मला सज्ज रहावे लागेल. मी किती चांगल्या प्रकारे परतीचा फटका मारतो यावर सामन्याचा निकाल अवलंबून असेल.’
महिला गटात झेक प्रजासत्ताकची २७ वी मानांकित पेट्रा क्वितोवा हिने देखील उपांत्यपूर्व फेरी गाठली. युवा सनसनाटी खेळाडू कोको गॉफ हिचा प्रवास मात्र चौथ्या फेरीत संपुष्टात आला. क्वितोवाने ग्रीसची २२ वी मानांकित मारिया सक्कारी हिला सरळ सेटमध्ये ६-७ (४/७),६-३,६-२ ने नमवले. अमेरिकेची १५ वर्षांच्या गॉफला पहिला सेट जिंकण्यात यश आले मात्र त्यानंतर सहकारी सोफिया केनिन हिच्याकडून ती ६-७, ६-३, ६-० ने पराभूत झाली.
दरम्यान ट्युनिशियाची ओनस झेबूर ही देखील उपांत्यपूर्व फेरी गाठण्यात यशस्वी ठरली. तिने चीनची २७ वी मानांकित वाँग कियोंग हिच्यावर ७-६,६-१ ने मात खळबळजनक मात केली. जेबूर ही कुठल्याही ग्रॅन्डस्लॅमची उपांत्यपूर्व फेरी गाठणारी अरब देशातील पहिली खेळाडू बनली. वांगने तिसऱ्याफेरीत सेरेना विलियम्सला पराभूत केले होते. (वृत्तसंस्था)
पेस- ओस्टापेंको दुसºया फेरीत
मेलबोर्न : भारताचा अनुभवी टेनिसपटू लियांडर पेस याने रविवारी याने येलेना ओस्टापेंकोच्या सोबतीने आॅस्ट्रेलियन ओपनमध्ये मिश्र दुहेरीची दुसरी फेरी गाठली. रोहण बोपन्ना हा देखील उपांत्यपूर्व फेरीत धडक देण्यात यशस्वी ठरला. २०१७ ची फ्रेंच ओपन चॅम्पियन जोडी पेस-ओस्टापेंको यांनी पहिल्या सेट गमविल्यानंतर जोरदार मुसंडी मारली. १ तास २७ मिनिटात त्यांनी स्टॉर्म सँडर्स- आणि मार्क पोलमॅन्स या स्थानिक वाईल्ड कार्डधारक जोडीचा ६-७, ६-३, १०-६ ने पराभव केला. पेस यंदा अखेरची आॅस्ट्रेलियन ओपन खेळत आहे. व्यावसायिक सर्किटमध्ये २०२० हे अखेर वर्ष असल्याची घोषणा पेसने आधीच केली होती. बोपन्ना आणि यूक्रेनचा त्याची जोडीदार नादिया किचेनोक यांनी दुसºया फेरीच्या सामन्यात निकोल मेलिचार- ब्रूनो सोरेस यांच्यावर ६-४, ७-६ ने मात केली.