आॅस्ट्रेलियन ओपन : जोकोविच, फेडरर तिस-या फेरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 02:37 AM2018-01-19T02:37:09+5:302018-01-19T02:37:22+5:30
सहा वेळा चॅम्पियन नोवाक जोकोविच, डॉमिनिक थिएम, मारिया शारापोवा, १९ वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन रॉजर फेडरर यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत
मेलबोर्न : सहा वेळा चॅम्पियन नोवाक जोकोविच, डॉमिनिक थिएम, मारिया शारापोवा, १९ वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन रॉजर फेडरर यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या तिसºया फेरीत प्रवेश केला. त्याचबरोबर कॅरोलिन गार्सिया, एग्निएंजका रदवांस्का यांनीही पुढील फेरीत प्रवेश केला.
मेलबोर्नच्या तापमानात वाढ झाल्याने खेळाडूंना चांगलाच घाम गाळावा लागला. जोकोविचने गेल मोनफिल्सला चार सेटमध्ये पराभूत केले. पहिला सेट गमाविल्यानंतर दोन तास चाललेल्या सामन्यात जोकोविचने मोनफिल्सवर ४-६, ६-३, ६-१, ६-३ असा विजय मिळविला. बारा वेळा ग्रॅँडस्लॅम जिंकलेल्या जोकोविचची लढत आता अल्बर्ट रामोस याच्याशी होणार आहे. स्पेनच्या अल्बर्ट रामोस विनोलासने अमेरिकेच्या टीम स्मिजेकला ६-४, ६-२, ७-६ असे पराभूत करीत तिसरी फेरी गाठली. हंगेरीच्या मार्टन फुकसोविक्सने अमेरिकेच्या सॅम क्वेरीला ६-४, ७-६, ४-६, ६-२ असे पराभूत करीत चांगलीच खळबळ माजवून दिली.
आॅस्ट्रेलियाचा पाचवा मानांकित डॉमिनिक थिएम याने पिछाडी भरून काढत डेनिस कुडला याला पराभूत केले. थिएमने कुडला याच्यावर ६-७, ३-६, ६-३, ६-२, ६-३ अशी मात केली. महिलांच्या गटात शारापोवाने आपला दावा मजबूत करीत तिसरी फेरी गाठली. शारापोवाने अनास्तासिजा सेवास्तोवाला ६-१, ७-६ अशा सरळ सेटमध्ये पराभूत केले. शारापोवाची लढत एंजेलिक कर्बरशी होण्याची शक्यता आहे. फ्रान्सची आठवी मानांकित कॅरोलिननला झेक गणराज्यच्या मार्केता वोंद्रोसोवावर विजय मिळविताना चांगलेच झुंजावे लागले. तीन सेटपर्यंत लांबलेल्या या सामन्यात तिने ६-७, ६-२, ८-६ असा विजय मिळविला. तिला पुढील फेरीत गर्बाइन मुगुरुजाशी लढावे लागण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या बर्नाडा पेराने ब्रिटनच्या योहाना कोंटाला ४-६, ५-७ असे पराभूत केले. स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने जर्मनीच्या जॉन-लेनार्ड स्टर्फचा ६-४, ६-४, ७-६ (७-४) गुणांनी पराभव करून तिसºया फेरीत प्रवेश केला. पोलंडच्या रदवांस्काला विजय मिळविण्यासाठी तीन सेटपर्यंत वाट पाहावी लागली. युक्रेनच्या लेसिया सुेरेंकाविरुद्ध तिने २-६, ७-५, ६-३ असा विजय संपादन केला. (वृत्तसंस्था)
अनुभवी लिएंडर पेस व पुरव राजा यांनी निकोलस बासिलाशविली व आंद्रियास हेदर मोरेर या जोडीचा ६-२, ६-३ असा पराभव केला. त्यांची लढत पाचव्या मानांकित जेमी मरे व ब्रुनो सोरेस या जोडीशी होणार आहे.
दिविज व राजीव राम यांच्या जोडीने रोमानियाच्या मारियस कोपिल व सर्बियाच्या व्हिक्टर ट्राइकी या जोडीवर ७-६, ६-४ असा विजय मिळविला. त्यांना आता फाबियो फोगनीनी व मार्सेल ग्रेनोलर्स या जोडीशी दोन हात करावे लागतील.
रोहन बोपन्ना व एडवर्ड रॉजर वेस्लीन या जोडीने रेयान हॅरिसन व वासेक पोसपिसिल या जोडीचा ६-२, ७-६ असा पराभव करीत दुसºया फेरीत प्रवेश केला.