ऑस्ट्रेलियन ओपन : जोकोविचचा शंभराव्या लढतीत विजय
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2024 05:35 AM2024-01-20T05:35:09+5:302024-01-20T05:35:44+5:30
विक्रमी २४ ग्रॅन्डस्लॅमचा विजेता असलेल्या जोकोविचचा ऑस्ट्रेलियन ओपनमधील विजयाचा विक्रम ९२-८ असा आहे.
मेलबोर्न : सर्बियाच्या नोवाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत शुक्रवारी १०० व्या सामन्यात विजयासह चौथ्या फेरीत धडक दिली. त्याने थॉमस मार्टिन एटचेवेरीचा सरळ सेटमध्ये ६-३, ६-३, ७-६ असा पराभव केला. विक्रमी २४ ग्रॅन्डस्लॅमचा विजेता असलेल्या जोकोविचचा ऑस्ट्रेलियन ओपनमधील विजयाचा विक्रम ९२-८ असा आहे.
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या जोकोने सरळ सेटमध्ये विजय साजरा करण्याची सध्याच्या स्पर्धेत ही पहिली वेळ ठरली. यादरम्यान जोकोने १० वेळा स्पर्धा जिंकली. मेलबोर्न पार्कमध्ये त्याने आज ३१ वा विजय साजरा केला. ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सर्वाधिक सामने त्याने (११७) आणि सेरेना विलियम्स (११५) यांनी जिंकले आहेत. जोकोविचने सुरुवातीच्या दोन सामन्यांत १-१ सेट गमावला होता. त्याचा पुढील सामना एड्रियन मन्नारिने याच्याविरुद्ध होईल. मन्नारिने याने बेन शेल्टनचा ७-६, १-६, ६-७, ६-३, ६-४ ने पराभव केला.
पुरुष एकेरीच्या अन्य सामन्यात मागचा उपविजेता स्टेफानोस सिटसिपास याने लुका वान एश याचा ६-३, ६-०, ६-४ ने आणि टेलर फ्रिट्झने फॅबियन मोरोजसन याचा ३-६, ६-४, ६-२, ६-२ असा पराभव केला. जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी असलेल्या यानिक सिनरने सॅबेस्टियन बेजचा ६-०, ६-१, ६-३ ने आणि ॲलेक्स मिनॉरने फ्लॅव्हियो कोबोलीचा ६-३, ६-३, ६-१ ने पराभव केला.
५२ मिनिटांत विजयासह एरिना सबालेंका चौथ्या फेरीत
रशियाची खेळाडू आणि गतविजेती एरिना सबालेंका हिने युक्रेनची लेसिया सुरेंको हिचा ६-०, ६-० ने ५२ मिनिटांत सहज पराभव करीत ऑस्ट्रेलियन ओपन टेनिसमध्ये शुक्रवारी महिला एकेरीची चौथी फेरी गाठली. दोन्ही देशांमध्ये युद्धाची स्थिती असल्याने उभय खेळाडूंनी सामन्यानंतर हस्तांदोलन करण्यास नकार दिला. सुरेंकोने सबालेंकाचे मात्र अभिनंदन केले.
आता सबालेंकाला अमांडा एनिसिमोवा हिच्याविरुद्ध खेळावे लागेल. अमांडाने पाऊला बाडोसा हिचा ७-५, ६-४ ने पराभव केला. मानसिक आरोग्याचे कारण देत ७ महिने ब्रेक घेतल्यानंतर अमांडा कोर्टवर परतली आहे.