ऑस्ट्रेलियन ओपन: चेंडू दिसत नाही, दिवे लावा हो..!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2018 07:58 PM2018-01-20T19:58:47+5:302018-01-20T19:58:58+5:30
मेलबोर्नच्या उकाड्यात सामन्यांचे पक्षपाती वेळापत्रक आणि आयोजनातील उणिवांमुळे दररोजच्या होणाऱ्या टीकेत शनिवारी जर्मनीच्या अॅलेक्झांडर झ्वेरेवच्या संतापाची भर पडली.
मेलबोर्न : यंदाची ऑस्ट्रेलियन ओपन खेळाबरोबरच ढिसाळ आयोजन आणि सुमार पंचगिरीने गाजत आहे. मेलबोर्नच्या उकाड्यात सामन्यांचे पक्षपाती वेळापत्रक आणि आयोजनातील उणिवांमुळे दररोजच्या होणाऱ्या टीकेत शनिवारी जर्मनीच्या अॅलेक्झांडर झ्वेरेवच्या संतापाची भर पडली.
हा चौथा मानांकित खेळाडू आपल्या तिसऱ्या फेरीच्या सामन्यादरम्यान ‘अहो, दिवे लावा हो..चेंडू व्यवस्थित दिसत नाही’ अशी तक्रार करत राहिला परंतु त्याचा पराभव जवळपास निश्चित झाल्यावरच पंच आणि आयोजकांनी त्याच्या तक्रारीची दखल घेतली.
आपल्या तक्रारीची दखल घेतली जात नसल्याचे पाहून झ्वेरेवने सामन्यातील पाचव्या आणि शेवटच्या सेटमध्ये अक्षरश: सामना सोडून दिल्यासारखा खेळ केला. दक्षिण कोरियाच्या हियॉन चुंगविरुद्धचा हा सामना त्याने तीन तास २२ मिनिटात ७-५, ६-७ (३-७), ६-२, ३-६, ०-६ असा गमावला.
या सामन्यातील अखेरच्या सेटमध्ये झ्वेरेवने फक्त पाचच गुण घेतले आणि चुंगच्या एका चुकीच्या तुलनेत तब्बल १४ वेळा चुकीचे फटके लगावले. हे त्याने शेवटी सामना सोडून दिल्याचेच लक्षण होते.
सामन्याच्या चौथ्या सेटपासून अंधारामुळे चेंडू व्यवस्थित दिसत नसल्याची झ्वेरेवची तक्रार सुरू झाली. या सेटमध्ये १-४ असा पिछाडीवर पडल्यावर तर तो भडकलाच आणि पंचांवर ‘दिवे सुरू करा हो..!’ असे ओरडला. तुम्हाला तिकडे अंधार आहे हे दिसत नाही का, अशी विचारणाही त्याने पंचांना केली.
सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत तो म्हणाला की मी सलग सहा गेमपर्यंत पंचांना अंधार असल्याने चेंडू दिसत नसल्याचे आणि दिवे लावण्यासाठी सांगत होतो परंतु पाच गेम होऊनही त्यांनी दिवे लावले नव्हते. झ्वेरेवबद्दल एक लक्षवेधी आकडेवारी समोर आली आहे ती अशी की...त्याने एटीपीच्या इतर सहा स्पर्धा जिंकल्या असल्या तरी ग्रँड स्लॅम स्पर्धांमध्ये तो एकदाही उपांत्यपूर्व फेरीच्या पुढे गेलेला नाही.
हॉक आय बंदचा गास्केटला फटका
नीक किरग्योसच्या सामन्यात पंचांकडील माईक सिस्टीम बंद पडल्याची घटना ताजी असताना आॅस्ट्रेलियन ओपनमध्ये शनिवारी रॉजर फेडरर आणि रिचर्ड गास्केट यांच्या सामन्यादरम्यान नाजूक गुणांचे निर्णय घेण्यासाठीची हॉक आय रिप्ले सिस्टिम बंद पडली. त्यामुळे दुसऱ्या सेटमध्ये ३-३ आणि ३०-३० अशी सर्व्हिस असताना फेडररच्या सर्व्हिसवर आज गास्केटला एका संभाव्य ब्रेकपॉर्इंटपासून वंचित रहावे लागले. फेडररची एस आऊट अशी जाहीर झाल्यावंर पंचांनी तो फटका योग्य असल्याचा निर्णय दिला होता परंतु गास्केटच्या मते ती वाईड होती परंतु हॉक आय सिस्टिम बंद असल्याने याचा अचूक निर्णय होऊ शकला नाही.
बर्डिचलाही पंच नडले
पंचगिरीची समस्या थॉमस बर्डिच आणि युआन मार्टीन डेल पोट्रोच्या सामन्यातही राहिली.त्यात लाईनमनने डेल पोट्रोचा एक आऊट ठरवलेला फटका मुख्य पंचांनी योग्य ठरवला. यामुळे बर्डिचने गुण गमावला. या निर्णयावर त्याने तीव्र नाराजी व्यक्त करत पंचांविरुद्ध आयोजकांकडे तक्रार केली आहे.