आॅस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम : दिग्गज फेडरर विश्वविक्रमी ग्रँडस्लॅम पटकावण्यास सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 02:23 AM2018-01-12T02:23:07+5:302018-01-12T15:28:09+5:30
जागतिक क्रमवारीत दुस-या स्थानी असलेला दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर याला आगामी आॅस्टेÑलियन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या पहिल्या फेरीत स्लोवानियाच्या अल्जाज बेडेन याच्याविरुद्ध भिडावे लागेल.
मेलबर्न : जागतिक क्रमवारीत दुस-या स्थानी असलेला दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर याला आगामी आॅस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या पहिल्या फेरीत स्लोवानियाच्या अल्जाज बेडेन याच्याविरुद्ध भिडावे लागेल. त्याच वेळी, फेडररने विजयी आगेकूच कायम राखल्यास उपांत्यपूर्व फेरीत त्याचा सामना अनुभवी डेव्हीड गॉफिन याच्याविरुद्ध होण्याची शक्यता आहे.
संभाव्य विजेता मानला जात असलेल्या स्टार फेडररपुढे जेतेपद कायम राखण्यासह विश्वविक्रमी २०वे ग्रँडस्लॅम पटकावण्याचीही संधी आहे. गुरुवारी काढण्यात आलेल्या स्पर्धेच्या ड्रॉनुसार फेडररला सलामीला जागतिक क्रमवारीत ५१व्या स्थानी असलेल्या बेडेनविरुद्ध खेळावे लागेल.
दुसरीकडे, जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेला स्पेनचा धडाकेबाज खेळाडू राफेल नदाल जागतिक क्रमवारीत ८३व्या स्थानी असलेल्या व्हिक्टर ईस्टेÑला बुर्गोसविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. त्याच वेळी उपांत्य फेरीत नदालचा सामना सहाव्या स्थानी असलेल्या क्रोएशियाच्या मरिन सिलिचविरुद्ध होऊ शकतो.
गतवर्षी विम्बल्डननंतर झालेल्या दुखापतीनंतर सर्बियाचा स्टार खेळाडू नोव्हाक जोकोविच टेनिसपासून दूर होता. मात्र, त्याने नुकताच कूयोंग क्लासिक स्पर्धेत जबरदस्त पुनरागमन करताना जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी असलेल्या डॉमनिक थीम याला सरळ तीन सेटमध्ये पराभूत केले होते. जोकोपुढे पहिल्या फेरीत अमेरिकेच्या डोंनाल्ड यंगचे आव्हान असेल. तसेच, जागतिक क्रमवारीतील तिसºया क्रमांकाचा ग्रिगोर दिमित्रोव सलामीला पात्रता फेरीतून आगेकूच करणाºया खेळाडूविरुद्ध खेळेल. (वृत्तसंस्था)
महिलांच्या गटामध्ये विम्बल्डन चॅम्पियन आणि तृतीय मानांकित गर्बाइन मुगुरुझा फ्रान्सच्या जेसिका पोंचेटेविरुद्ध पहिल्या लढतीत खेळेल. जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेली रोमानियाची सिमोना हालेप अमेरिकेच्या वाइल्ड कार्डप्राप्त देस्तानी अएवाविरुद्ध जेतेपदाच्या मोहिमेला सुरुवात करेल. उपांत्यपूर्व फेरीत हालेपचा सामना कॅरोलिना पिलिस्कोवाविरुद्ध होऊ शकतो.
त्याच वेळी, डोपिंगमुळे १५ महिने टेनिसपासून दूर राहिलेली २००८ ची चॅम्पियन रशियाची मारिया शारापोवा यंदा स्पर्धेत बिगरमानांकित असेल. नुकताच अव्वल ५० खेळाडूंमध्ये स्थान मिळवलेली शारापोवा पहिल्या लढतीत जागतिक क्रमवारीत ४७व्या स्थानी असलेल्या जर्मनीच्या तातजना मारियाविरुद्ध लढेल. तसेच, ३७ वर्षीय अनुभवी व्हिनस विलियम्स सलामीला स्वित्झर्लंडच्या बेलिंडा बेनसिक हिच्याविरुद्ध भिडेल.
बेलिंडा हिने नुकताच दिग्गज रॉजर फेडररसह हॉफमन चषक स्पर्धेच्या मिश्र दुहेरीचे जेतेपद पटकावले.