आॅस्ट्रेलियन ओपनमध्ये ‘रुकावट के लिये खेद है’; प्रेक्षक, हेलिकॉप्टर आणि तांत्रिक दोषांनी हंगामा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2018 07:54 PM2018-01-17T19:54:36+5:302018-01-17T20:20:27+5:30
आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत स्थानिक खेळाडू निक किरग्योस याने जिंकलेला दुसऱ्या फेरीचा सामना भलताच मसालेदार ठरला. या सामन्यात वेळोवेळी वेगवेगळ्या कारणांनी व्यत्यय येत गेला आणि तापट स्वभावाच्या किरग्योसचा संताप वाढत गेला.
मेलबोर्न : आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत स्थानिक खेळाडू निक किरग्योस याने जिंकलेला दुसऱ्या फेरीचा सामना भलताच मसालेदार ठरला. या सामन्यात वेळोवेळी वेगवेगळ्या कारणांनी व्यत्यय येत गेला आणि तापट स्वभावाच्या किरग्योसचा संताप वाढत गेला. या सामन्यात आरंभी एका उत्साही प्रेक्षकाच्या मोबाईलवर शूटींग वेडाने खेळ थांबला, त्यानंतर सामना खेळला जात
असलेल्या हायसेन्स कोर्टवर आकाशात एक हेलिकॉप्टर बराचवेळ घुटमळत राहिले, त्यानंतर पंचांकडे उद्घोषणांसाठी दिलेले माईकच बंद पडले आणि यात भर किरग्योसच्या भावाने घातलेल्या आपत्तीजनक टी-शर्टची पडली.
दुसऱ्या सेटमध्ये पंचांनी सायलेंसची घोषणा केल्यावर आणि किरग्योस सर्विस करण्याच्या तयारीत असतानाच मोबाईलमध्ये शूटींग करण्यासाठी मध्येच उठून आलेल्या एका प्रेक्षकाने त्याचे लक्ष विचलीत केले. गेल्याच सामन्यात प्रेक्षकाबद्दल अपशब्द वापरण्यासाठी 3 हजार डॉलरचा दंड झालेला किरग्योस साहजिकच भडकला आणि त्याने 10 ते 15 सेकंद त्या प्रेक्षकाकडे तीव्र कटाक्ष टाकला. सुरक्षारक्षकांनी त्या प्रेक्षकाला हटवल्यावरच किरग्योसने पुन्हा खेळायला सुरुवात केली पण त्याआधी जाहिरपणे त्या प्रेक्षकाला ‘वेल डन, यु आर अॅन इडियट’ असे सुनावण्यास तो विसरला नाही.
यानंतर हायसेन्स कोर्टवर आकाशात एक हेलिकॉप्टर बराच वेळ घिरट्या घालत राहिले. त्याच्या आवाजानेही खेळात व्यत्यय आला. खेळ सुरू असला तरी कोर्टवर काहीच कळेनासे झाल्याने दोन्ही खेळाडू हैराण झाले.
हे कमी की काय म्हणून नंतर पंचांकडे सामन्यादरम्यान उद्घोषणा करण्यासाठी दिलेले माईकच बिघडले. ब्रेकदरम्यान चालवली जाणारी म्युझीक सिस्टिम बंद पडली. माईक पूर्ण बंद पडले असते तर ठीक होते पण ते मधूनच काम करायचे, मध्येच बंद पडायचे. त्यामुळे झालेल्या गोंधळात माईकवर आवाज आला तर प्रेक्षकांनी ओरडा करून आनंद व्यक्त करत गोंधळात आणखीनच भर घातली.
या प्रकाराने किरग्योस एवढा वैतागला की त्याने शेवटी पंचांना सांगितले, ‘ कृपया, स्कोअर बोलू नका कारण तुम्ही बोलताच हास्यस्फोट होतोय आणि आम्हाला खेळणं अवघड झालंय.. ‘काय चाललंय हे? ही साधारण गोष्ट नाही, यावर तुम्ही काही करणार आहात की नाही, अशी विचारणासुद्धा त्याने केली.
एवढ्या सगळ्या गोंधळात प्रचंड संताप होऊनही अखेर व्हिक्टर ट्रोयकीविरुद्धचा हा सामना किरग्योसने 7-7, 6-4,7-6 असा जिंकला. सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत किरग्योस म्हणाला, की हा सामना नव्हता तर सर्कस होती.
आॅस्ट्रेलियन जॉन मिलमन आणि बोस्रियाच्या दामिर झुमूर यांच्यासामन्यादरम्यानही प्रेक्षकांनी सर्व मर्यादा ओलांडल्याची तक्रार दोन्ही खेळाडूंनी केली. रॅलीदरम्यान आणि सर्व्हिसवेळी नेमका चेंडू फटकावण्याच्या वेळेलाच प्रेक्षकांच्या गोंधळ करण्याच्या सवयीेबद्दल या दोघांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.