ऑस्ट्रेलियन ओपन : नंबर 1 सिमोना हालेपचा विजयासाठी पावणेचार तास संघर्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2018 07:22 PM2018-01-20T19:22:26+5:302018-01-20T19:22:51+5:30
जगातील नंबर वन टेनिसपटू रूमानियाची सिमोना हालेप हिला ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत शनिवारी खऱ्या अर्थाने ‘नंबर वन’ सारखा खेळ करून दाखवावा लागला.
मेलबोर्न : जगातील नंबर वन टेनिसपटू रूमानियाची सिमोना हालेप हिला ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत शनिवारी खऱ्या अर्थाने ‘नंबर वन’ सारखा खेळ करून दाखवावा लागला. अमेरिकेच्या लॉरेन डेव्हिसने तिला विजयासाठी तब्बल पावणेचार तास झुंजायला भाग पाडले. यादरम्यान सिमोना एक दोन वेळा नाही तर तीन वेळा अक्षरश: हरता हरता वाचली. तब्बल तीन मॅचपॉर्इंट वाचवत सिमोनाने हा मॅरेथॉन सामना ४-६, ६-४, १५-१३ असा जिंकला आणि चौथी फेरी गाठली.
१९९६ नंतरचा ऑस्ट्रेलियन ओपनमधला हा सर्वाधिक गेम खेळला गेलेला सामना ठरला. १९९६ मध्ये उपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेच्या चंदा रूबीनने स्पेनच्या अरांता सांचेझ व्हिकारिओवर ६-४, २-६, १६-१४ असा विजय मिळवला होता. नेमके तेवढेच ४८ गेम शनिवारच्या सामन्यातही खेळले गेले.
या सामन्यातील शेवटचा एकच सेट तब्बल दोन तास २२ मिनीटे चालला. या अक्षरश: दमछाक करणाऱ्या विजयानंतर सिमोना म्हणाली की, एवढा प्रदीर्घ तिसरा सेट मी कधीच खेळले नव्हते. मी प्रचंड थकली होती. माझे पायाचे घोटे आणि स्रायू अक्षरश: बधीर झाले होते.
या सामन्यातील तिसऱ्या सेटमध्ये तीन वेळा हालेपला मॅच पॉर्इंट होता परंतु प्रत्येक वेळी डेव्हिसने तिला विजयापासून वंचित ठेवले. तिसऱ्या सेटमध्ये ५-४, ६-५ आणि ८-७ असा स्कोअर असताना हालेपला हे मॅचपॉर्इंट मिळाले होते. या थकविणाऱ्या विजयानंतर हालेपचा चौथ्या फेरीचा सामना आता जपानच्या नाओमी ओसाकाशी होईल.