ऑस्ट्रेलियन ओपन : पेस-राजा जोडीचा मॅचपॉर्इंट वाचवत विजय
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2018 09:37 PM2018-01-20T21:37:18+5:302018-01-20T21:37:27+5:30
ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत भारताच्या दिग्गज लिअँडर पेस व पुरव राजा यांच्या जोडीने पुरूष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे.
मेलबोर्न - ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत भारताच्या दिग्गज लिअँडर पेस व पुरव राजा यांच्या जोडीने पुरूष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. यासाठी तिसऱ्या फेरीत शनिवारी त्यांनी ब्रुनो सोआरेस व जेमी मरे या पाचव्या मानांकित जोडीला पराभवाचा धक्का दिला. पेस-राजा जोडीने हा सामना तीन तासाच्या संघर्षानंतर ७-६ (७-३), ५-७, ७-६ (८-६) असा जिंकला.
या स्पर्धेसाठी पेस-राजा जोडीला मानांकन मिळालेले नसून ते सलग दुसरी ग्रँड स्लॅम स्पर्धा जोडीने खेळत आहेत.गेल्या वर्षी ते युएस ओपनच्या दुसऱ्या फेरीत पराभूत झाले होते. या सामन्यात राजाचा नेटजवळचा चपळाईचा खेळ विजय मिळवून देणारा ठरला. सामना तिसऱ्या सेटमध्ये टाय ब्रेकरवर गेल्यावरही ५-५ अशी अटीतटीची लढत होती. त्यावेळी जेमी मरेने आपल्या संघासाठी मॅचपॉर्इंट मिळविला होता परंतु राजाने दमदार सर्व्हिस करत तो मॅचपॉर्इंट तर वाचवलाच शिवाय आपल्या संघाला पुढचा गुण घेत मॅचपॉर्इंट मिळवून दिला. त्यावेळी सोअरेसच्या सर्विसवर बॅकहँड रिटर्नचा गुण घेत राजाने भारतीय जोडीसाठीचा विजय साजरा केला.
पेस-राजा जोडीचा पुढचा सामना आता जुआन सेबॅस्टियन कबाल व रॉबर्ट फरा या ११ व्या मानांकित जोडीशी होईल. हा सामना जिंकल्यास पेस-राजा जोडी उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवेल. ४४ वर्षीय पेसने याआधी २०१६ च्या फ्रेच ओपनची उपांत्यपूर्व फेरी गाठली होती.