ऑस्ट्रेलियन ओपन : रॉजर फेडरर- नोव्हाक जोकोव्हिच उपांत्य फेरीत झुंजणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2020 02:23 AM2020-01-29T02:23:49+5:302020-01-29T02:24:24+5:30
फेडररने चौथ्या सेटमध्ये ४-५ च्या स्कोअरवर तीन व नंतर टायब्रेकमध्ये चार मॅच पार्इंट वाचवले.
मेलबोर्न : स्वित्झर्लंडचा दिग्गज रॉजर फेडररचा चमत्कारावर विश्वास असून असाच चमत्कार त्याने मंगळवारी येथे आॅस्ट्रेलियन ओपनमध्ये केला. या ३८ वर्षीय खेळाडूने तब्बल ७ मॅच पॉर्इंट वाचवून वर्षातील पहिल्या ग्रँडस्लॅमची उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीत फेडररची गाठ सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचसोबत पडणार आहे.
फेडररने चौथ्या सेटमध्ये ४-५ च्या स्कोअरवर तीन व नंतर टायब्रेकमध्ये चार मॅच पार्इंट वाचवले. आक्रमक फटक्यांसाठी ओळखल्या जाणारा व कोर्टवर चपळ असलेल्या सँडग्रेनचा फेडररने रोमांचक लढतीत ६-३, २-६, २-६, ७-६(१०/८), ६-३ असा झुंजार पराभव केला.
फेडररची विजयाची भूक अद्यापही पूर्वीप्रमाणेच कायम आहे आणि त्याने वेळोवेळी ते सिद्धही केले आहे. १५ व्यांदा आॅस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवलेल्या फेडरर आता जोकोव्हिचच्या तगड्या आव्हानाला सामोरे जाईल.
जोकोव्हिचने कॅनडाच्या मिलोस राओनिचला नमवत आगेकूच केली. जागतिक क्रमवारीत दुसरा असलेल्या जोकोने आक्रमक सर्व्हिससाठी ओळखल्या जाणाऱ्या राओनिचचा ६-४, ६-३, ७-६ असा पराभव करीत आठवे आॅस्ट्रेलियन ओपन व १७ वे ग्रँडस्लॅम पटकावण्याच्या दिशेने वाटचाल केली. (वृत्तसंस्था)