ऑस्ट्रेलियन ओपन : रॉजर फेडरर, राफेल नदाल यांची विजयी सलामी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2019 10:44 AM2019-01-15T10:44:14+5:302019-01-15T10:45:01+5:30
आपल्या कारकिर्दीतील विक्रमी २१व्या ग्रँडस्लॅम जेतेपद मिळविण्याच्या प्रयत्नात असलेल्या स्वित्झर्लंडचा दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत विजयी सलामी दिली.
मेलबर्न : आपल्या कारकिर्दीतील विक्रमी २१व्या ग्रँडस्लॅम जेतेपद मिळविण्याच्या प्रयत्नात असलेल्या स्वित्झर्लंडचा दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररनेऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत विजयी सलामी दिली. उझबेकिस्तानच्या डेनिस इस्तोमिन याचा सरळ तीन सेटमध्ये पराभव करत फेडररने विजयी सुरुवात केली. स्पेनचा दिग्गज राफेल नदाल यानेही सरळ तीन सेटमध्ये बाजी मारताना सहज आगेकूच केली असून, ब्रिटनचा स्टार अँडी मरे याला मात्र पहिल्याच फेरीत आपला गाशा गुंडाळावा लागला. या पराभवासह मरेने टेनिसमधून निवृत्तीही स्वीकारली.
सध्या शानदार फॉर्ममध्ये असलेल्या फेडररने आपल्या लौकिकानुसार खेळ करताना, डेनिसचा सरळ तीन सेटमध्ये ६-३, ६-४, ६-४ असा पराभव केला. फेडररच्या मोठ्या अनुभवापुढे डेनिसला टेनिसचे धडेच मिळाले. फेडररने फोरहँडसह आपल्या विशेष बॅकहँड फटक्यांच्या जोरावर डेनिसला पुनरागमनाची संधीच दिली नाही. दुसरीकडे, गेल्या मोसमात पायाच्या दुखापतीमुळे अनेक स्पर्धांतून माघार घेतलेल्या नदालनेही आश्वासक सुरुवात करताना विजयी सलामी दिली. त्याने ऑस्ट्रेलियाच्या जेम्स डकवर्थ याचा सरळ तीन सेटमध्ये ६-४, ६-३, ७-५ असा पराभव केला.
त्याच वेळी अन्य लढतीत अँडी मरेचा पराभव टेनिस चाहत्यांसाठी जितका धक्कादायक होता, तितकाच तो भावनिकही ठरला. दुखापतींना सामोरे जात असलेल्या मरेने या आधीच यंदाची ऑस्ट्रेलियन स्पर्धा आपली अखेरची स्पर्धा असेल, असे घोषित केले होते. या वेळी पहिल्याच फेरीत २२व्या मानांकित रॉबर्टो बटिस्ता अगुट याने झुंजार खेळाचे प्रदर्शन करताना मरेचे कडवे आव्हान ६-४, ६-४, ६-७ (५), ६-७(४), ६-२ असे संपुष्टात आणले. या पराभवासह मरेने स्पर्धात्मक टेनिस विश्वाला गुडबायही केले.
महिलांमध्ये दुसऱ्या मानांकित अँजोलिक कर्बरने स्लोवेनियाच्या पोलोना हर्कोग हिला ६-२, ६-२ असे सहज पराभूत करत विजयी सलामी दिली. अन्य लढतीत कॅरोलिन वोजनियाकीनेही विजयी कूच करताना, बेल्जियमच्या एलिसन वॅन उतिवान्सक हिचा ६-३, ६-४ असा पराभव केला.
नदालने दमदार पुनरागमन करताना शानदार बाजी मारत प्रतिस्पर्धी खेळाडूंना इशारा दिला. फेडररने आपल्या लौकिकानुसार सहज विजयी सलामी देताना विक्रमी जेतेपद पटकावण्याच्या मोहिमेला सुरुवात केली. राफा, फेडरर यांनी अपेक्षित खेळ करताना चाहत्यांच्या आशा उंचावल्या.
महिलांमध्ये कर्बर, शारापोवा यांचा धडाका
त्याचप्रमाणे, सर्वात लक्षवेधी राहिला, तो २००८ साली या स्पर्धेत विजेती ठरलेल्या रशियाच्या मारिया शारापोवाचा खेळ. मारियाने शानदार विजयासह सुरुवात करताना ब्रिटनच्या हॅरियट डार्ट हिचा ६-०, ६-० असा धुव्वा उडविला.
प्रजनेश गुणेश्वरन पहिल्याच फेरीत बाद
पहिल्यांदा ग्रँडस्लॅम स्पर्धा खेळत असलेल्या भारताच्या प्रजनेश गुणेश्वरनला पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला. अमेरिकेच्या फ्रान्सिस टियाफोविरुद्ध झालेल्या सामन्यात प्रजनेशचा ६-७, ३-६, ३-६ असा पराभव झाल्याने, त्याचे ग्रँडस्लॅम पदार्पण निराशाजनक झाले. पहिला सेट टायब्रेकपर्यंत नेल्यानंतर प्रजनेशला आपली लय कायम राखण्यात अपयश आले.
अखेरचा सामना चांगल्या रीतीने संपला - मरे
ब्रिटनचा दिग्गज खेळाडू अँडी मरे याने रॉबर्टो बतिस्ता आगुट याच्याकडून पाच सेटपर्यंत रंगलेल्या संघर्षपूर्ण सामन्यानंतर, ‘ही लढत चांगल्या रीतीने संपली,’ असे मत व्यक्त केले. जागतिक क्रमवारीतील माजी नंबर वन खेळाडू अँडी मरे याने याआधीच आॅस्ट्रेलियन ओपनचा त्याचा सामना शेवटचा ठरू शकतो, असे स्पष्ट केले होते.
या सामन्यात मरे याला पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते. सामना झाल्यानंतर मरे म्हणाला, ‘ही बाब अविश्वसनीय व शानदार होती. आज येथे येण्यासाठी सर्वांचे आभार. प्रामाणिकपणे सांगायचे म्हटल्यास मला अनेक वर्षांपासून येथे खेळणे आवडते. हा माझा अखेरचा सामना होता आणि तो शानदाररीतीने संपला. मी माझ्याकडून सर्वतोपरी प्रयत्न केले; परंतु ते पुरेशे नव्हते.’’