Australian Open: सेरेना विलियम्स व सबालेंकाची चौथ्या फेरीत धडक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2021 05:21 AM2021-02-13T05:21:38+5:302021-02-13T05:23:10+5:30

जागतिक क्रमवारीत २०१ व्या स्थानावर असलेल्या खेळाडूविरुद्ध सेरेना पहिल्या सेटच्या टायब्रेकमध्ये ५-३ ने पिछाडीवर होती, पण त्यानंतर सलग चार गुण वसूल करीत तिने सेट जिंकला.

Australian Open Serena Williams, Naomi Osaka, Aryna Sabalenka advance | Australian Open: सेरेना विलियम्स व सबालेंकाची चौथ्या फेरीत धडक

Australian Open: सेरेना विलियम्स व सबालेंकाची चौथ्या फेरीत धडक

googlenewsNext

मेलबोर्न : दिग्गज टेनिसपटू सेरेना विलियम्सने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये शुक्रवारी १९ वर्षांच्या अनास्तासिया पोटापोव्हाचा ७-६, ६-२ ने पराभव करीत चौथ्या फेरीत स्थान निश्चित केले. स्पर्धा सुरू असताना विलगीकरणाच्या हॉटेलमध्ये कोरोना संक्रमणाचे प्रकरण समोर आल्यानंतर व्हिक्टोरिया प्रदेश सरकारने शनिवारपासून लॉकडाऊन लावण्याची घोषणा केली, पण पुढील पाच दिवस ऑस्ट्रेलियन ओपनला प्रेक्षकांविना सुरू ठेवण्याची परवानगी मिळाली आहे.

सामन्याच्या पहिल्या सेटमध्ये २५ टाळण्याजोग्या चुका केल्यानंतर ज‌वळजवळ २० वर्षांनी लहान असलेल्या खेळाडूविरुद्ध वर्चस्व गाजवणाऱ्या सेरेनाने प्रेक्षकांच्या अनपुस्थितीत म्हटले की,‘ही आदर्श स्थिती नाही, प्रेक्षकांचे स्टेडियममध्ये येणे चांगली बाब होती. पण, तुम्हाला कुठल्याही स्थितीमध्ये चांगली कामगिरी करायला हवी. सर्वकाही चांगले होईल, अशी आशा आहे.’

जागतिक क्रमवारीत २०१ व्या स्थानावर असलेल्या खेळाडूविरुद्ध सेरेना पहिल्या सेटच्या टायब्रेकमध्ये ५-३ ने पिछाडीवर होती, पण त्यानंतर सलग चार गुण वसूल करीत तिने सेट जिंकला.

ऑस्ट्रेलियन ओपनच्या सात जेतेपदासह एकूण २३ ग्रँडस्लॅम विजेतेपदाचा अनुभव असलेल्या सेरेनाविरुद्ध पोटापोव्हाकडे दुसऱ्या सेटमध्ये कुठले उत्तर नव्हते. सेरेनाला पुढच्या फेरीत बेलारूसच्या एरिना सबालेंकाच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. सबालेंकाने ग्रँडस्लॅममध्ये आपली सर्वोत्तम कामगिरी करताना ऑस्ट्रेलियन ओपनच्या चौथ्या फेरीत प्रवेश केला. सबालेंकाने अमेरिकेच्या एन लीचा ६-३, ६-१ ने पराभव केला. सबालेंका अव्वल १६ मध्ये समावेश असलेली एकमेव अशी खेळाडू आहे जी आजतागायत कुठल्या ग्रँडस्लॅमच्या क्वार्टरफायनलमध्ये पोहोचलेली नाही. ती २०१८ मध्ये अमेरिकन ओपनच्या चौथ्या फेरीत पोहोचली होती.

तिसऱ्या फेरीत १४ व्या मानांकित गार्बाईन मुगुरुजाने जरीना दियासचा ६-१, ६-१ ने पराभव केला, तर मार्केंटा वोंड्राउसोव्हाने सोराना ख्रिस्टीवर ६-२, ६-४ ने मात केली.

पुरुष विभागात २०२० अमेरिकन ओपनचा उपविजेता अलेक्जेंडर ज्वेरवने सरळ सेट्समध्ये विजय नोंदवला, तर १८ व्या मानांकित ग्रिगोर दिमत्रोव्ह प्रतिस्पर्धी पाब्लो कार्रेनोने सामन्यादरम्यान माघार घेतल्यामुळे पुढची फेरी गाठली. डोमिनिक थीमने पहिले दोन सेट गमावल्यानंतर स्थानिक खेळाडू निक किर्गियोसचा ४-६, ४-६, ६-३, ६-४, ६-४ ने पराभव केला. आता त्याला १८ व्या मानांकित ग्रिगोर दिमित्रोव्हच्या आव्हानाला सामोेरे जावे लागेल. आठव्या मानांकित डिएगो श्वार्टजमॅन स्पर्धेतून गाशा गुंडाळणारा पहिला दिग्गज खेळाडू ठरला.

जोकोविच जखमी, खेळण्याविषयी शंका
अव्वल टेनिसपटू सर्बियाचा नोवाक जोकोविच याच्या, ऑस्ट्रेलियन ओपनचे नववे जेतेपद मिळविण्याच्या मोहिमेला धक्का बसला आहे. शुक्रवारी सामन्यादरम्यान त्याच्या मांसपेशी ताणल्या गेल्या. त्याला चौथ्या फेरीत रविवारी मिलोस राओनिच याचा सामना करायचा आहे, मात्र तो हा सामना खेळू शकेल का, याविषयी शंका आहे. आज सामन्यादरम्यान त्याला ‘मेडिकल टाईमआऊट’ घ्यावा लागला. जोकोविच म्हणाला,‘पुढील सामन्यात खेळू शकेन की नाही याची मला स्वत:ला खात्री वाटत नाही.’

Web Title: Australian Open Serena Williams, Naomi Osaka, Aryna Sabalenka advance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.