बोपन्ना-बाबोस जोडीला उपविजेतेपद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 01:37 AM2018-01-29T01:37:43+5:302018-01-29T01:38:13+5:30
भारताचा रोहन बोपन्ना आणि हंगेरीेची टिमिया बाबोस यांना आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरीच्या उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या पाचव्या मानांकित जोडीला क्रोएशियाचा माटे पाविक आणि कॅनडाची गॅब्रिएल डेब्रोवस्की या आठव्या मानांकित जोडीने एक तास ८ मिनिटात २-६, ६-४, ११-९ असे पराभूत केले.
मेलबर्न : भारताचा रोहन बोपन्ना आणि हंगेरीेची टिमिया बाबोस यांना आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरीच्या उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या पाचव्या मानांकित जोडीला क्रोएशियाचा माटे पाविक आणि कॅनडाची गॅब्रिएल डेब्रोवस्की या आठव्या मानांकित जोडीने एक तास ८ मिनिटात २-६, ६-४, ११-९ असे पराभूत केले.
टाय ब्रेकमध्ये एकवेळ बोपन्नाच्या जोडीकडे मॅचपॉर्इंट होता परंतु पाविकने लागोपाठ दोन एसेस लगावून मॅचपॉर्इंट तर वाचवलाच शिवाय आपल्या संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. त्यानंतर गॅब्रिएलाच्या फोरहँडने त्यांच्या विजयावर मोहर उमटवली.
पहिला सेट बोपन्ना व बाबोसने २४ मिनिटात जिंकला. त्यानंतर टाय ब्रेकमध्ये त्यांनी पहिले तीन गूण गमावले होते परंतु त्यानंतर ३७ वर्षीय बोपन्नाने लढत ६-६ अशी बरोबरीवर आणली होती मात्र विजयाबाबत ते अपयशी ठरले.
पाविकसाठी पुरूष दुहेरीपाठोपाठ हे दुसरे विजेतेपद ठरले तर टिमिया बाबोसचा मात्र दुहेरी मुकूटाचा मान हुकला. ती शनिवारी क्रिस्टीना लाडेनोव्हिकसोबत महिला दुहेरीत अजिंक्य ठरली होती. विशेष म्हणजे डब्रोवस्की ही गेल्या वर्षीच्या फ्रेंच ओपन अजिंक्यपदासाठी बोपन्नाची पार्टनर होती मात्र यावेळी ती त्याच्याविरुद्ध खेळली.
रॉजर फेडररला ‘नो चॅलेंज’
स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने आपला विजयी धडाका सुरूच ठेवत सहाव्यांदा आॅस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावले. पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात रविवारी त्याने क्रोएशियाच्या मरिन सिलिचचा ६-२, ६-७, ६-३, ३-६, ६-१ असा पराभव केला. ३६ वर्षे वय ओलांडलेल्या फेडररचे हे २० वे ग्रँड स्लॅम अजिंक्यपद आहे.
प्रचंड उष्णतेमुळे रॉड लेव्हर एरिनात अंतिम सामना बंद छताखाली वातानुकूलित वातावरणात खेळला गेला. त्यात तीन तास दोन मिनिटे जबरदस्त संघर्ष बघायला मिळाला. या सामन्यात चौथा सेट गमावताना द्वितीय मानांकित फेडररने ओळीने पाच गेम गमावले होते, परंतु त्यानंतर अंतिम सेटमध्ये अफलातून खेळ करीत त्याने सिलिचला संधीच दिली नाही. पाचव्या आणि निर्णायक सेटमध्ये सुरुवातीलाच सिलिचकडे फेडररची सर्व्हिस ब्रेक करण्याच्या दोन संधी होत्या, परंतु त्याने त्या गमावल्या. त्यानंतर दुसºया गेममध्ये दोन वेळा डबल फॉल्ट करून सिलिचने स्वत:च सर्व्हिस गमावली आणि हाच सामन्याला कलाटणी देणारा क्षण ठरला.
या स्पर्धेत सलग दुसºया वर्षी विजेता ठरलेल्या फेडररने सामन्याच्या आरंभीच ४-० अशी आघाडी घेत २४ मिनिटांत पहिला सेट ६-२ असा जिंकला. या सेटमध्ये फेडररने आपल्या सर्व्हिसवर केवळ दोन गुण गमावले, एवढे त्याचे वर्चस्व होते. दुसरा सेट टायब्रेकरपर्यंत लांबल्यावर सिलिचने १-१ बरोबरी साधली. या सेटच्या दहाव्या गेममध्येच फेडररच्या दोन डबल फॉल्टमुळे सिलिचला सेट पॉर्इंट मिळाला होता, परंतु त्यानंतरही फेडररने टायब्रेकरपर्यंत सेट खेचण्यात यश मिळवले. तासाभराच्या संघर्षानंतर सिलिचने दुसरा सेट जिंकून लढत बरोबरीवर आणली. पुन्हा दोघींनी एक-एक सेट घेतल्याने लढत पाचव्या आणि निर्णायक सेटमध्ये पोहोचली. त्यात फेडररने ६-१ अशी सहज बाजी मारली.
३६ वर्षे १७३ दिवस अशा वयात ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावणारा फेडरर टेनिसच्या खुल्या युगातील दुसरा सर्वाधिक वयाचा खेळाडू आहे. त्याच्यापेक्षा अधिक वयात केवळ केन रोझवाल यांनीच ग्रँड स्लॅम दर्जाची स्पर्धा (आॅस्ट्रेलियन ओपन, १९७२ आणि वय ३७ वर्षे) जिंकली आहे.
टेनिस इतिहासात २० पेक्षा अधिक ग्रँड स्लॅम अजिंक्यपद पटकावणारा फेडरर पहिलाच पुरुष आणि एकूण चौथा टेनिसपटू आहे. त्याच्याआधी मागार्रेट कोर्ट, सेरेना विल्यम्स आणि स्टेफी ग्राफ यांनी २० पेक्षा अधिक ग्रँड स्लॅम जिंकल्या आहेत. नोव्हाक जोकोविच आणि रॉय इमरसन यांच्यानंतर आॅस्ट्रेलियन ओपन सहा वेळा जिंकणारा तो केवळ तिसराच खेळाडू आहे. हे अजिंक्यपद पटकावताना फेडररने अंतिम फेरीआधी एकही सेट गमावलेला नव्हता, पण आज सिलिचने त्याच्याविरुद्ध दोन सेट घेतले. सिलिचविरुद्धचा फेडररचा १० लढतींतील हा नववा विजय होता. या विजेतेपदासाठी फेडररला २००० एटीपी गुण आणि ४० लाख डॉलर व उपविजेत्या सिलिचला १२०० गुण आणि २० लाख डॉलरची प्राप्ती झाली. फेडररच्या २० ग्रँड स्लम अजिंक्यपदांमध्ये विम्बल्डनची ८, फ्रेंच ओपनचे एक, यूएस ओपनची ५ आणि आॅस्ट्रेलियन ओपनच्या सहा विजेतेपदांचा समावेश आहे. या माजी नंबर वन खेळाडूचे हे ९६ वे विजेतेपद आहे.