टेनिसवेड्यांची जत्रा, नदालच्या स्वाक्षरीसाठी त्यानं खर्च केले 'एवढे' रुपये
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 03:15 AM2020-01-11T03:15:04+5:302020-01-11T03:27:05+5:30
‘नदाल, नदाल, नदाल...’ शुक्रवारी सिडनी आॅलिम्पिक पार्क याच नावाने दुमदुमून गेले.
- उदय बिनीवाले, थेट सिडनीहून
‘नदाल, नदाल, नदाल...’ शुक्रवारी सिडनी आॅलिम्पिक पार्क याच नावाने दुमदुमून गेले. उप-उपांत्य फेरीतील सामने पाहण्यासाठी लीडकोम स्टेशन ते आॅलिम्पिक पार्क स्टेशन ट्रेन टेनिसप्रेमींनी दुथडी भरून वाहत होत्या. शुक्रवारी यजमान आॅस्ट्रेलिया, बाद फेरीतील पहिला सामना खेळत असल्याने, प्रचंड संख्येने रसिक गर्दी करत असल्याचे आढळले.
सिडनीत तापमान साधारण असून हवामान ढगाळ आहे. प्रेक्षक कोर्टच्या बाहेर आराम खुर्च्यांत पहुडून, तसेच मोकळ्या हिरवळीवर गटागटाने बसून उच्च दर्जाच्या टेनिसचा आस्वाद घेत असतानाचे चित्र जबरदस्त होते. सर्वच वयोगटाचे टेनिसप्रेमी उत्साहाने स्टेडियमकडे येताना दिसले.
एका वृद्ध टेनिसप्रेमीसोबत या दरम्यान संवाद साधला. ७८ वर्षीय जॉन आणि त्यांची पत्नी अगदी हळू चालत टेनिस कोर्टकडे निघाले होते. ते म्हणाले, ‘आम्ही आॅस्ट्रेलियाचा खेळ पाहण्यासाठी आलो असून, कप आम्ही जिंकू अशी आशा आहे.’ एक भारतीय टेनिसप्रेमी कार्थिक श्रीधरनही भेटला. तो चार दिवस, आॅफिसला रजा टाकून येथे ठाण मांडून बसलाय. का? तर नदालच्या स्वाक्षरीसाठी. नदालचे नाव असलेले टी शर्ट परिधान करून नदालची स्वाक्षरी मिळतेय का? याकडे डोळे लावून तो बसलाय आणि यासाठी त्या पठ्ठ्याने तब्बल खर्च केलेत १५०० डॉलर्स फक्त.. म्हणजेच रु.७५ हजार. याला म्हणतात टेनिसवेडे. इतका खर्च करून हा श्रीधरन केवळ नदाल आणि फेडररचा खेळ पाहण्यासाठी मेलबोर्नला आॅस्टेÑलियन ओपनसाठीही जाणार आहे. असे अनेक भन्नाट टेनिसवेडे स्टेडियमवर संचार करताना दिसतात.