महिलांच्या तुलनेत पुरुष टेनिसपटूंना जास्त शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2018 11:41 PM2018-09-16T23:41:58+5:302018-09-16T23:42:18+5:30
दिग्गज टेनिसपटू सेरेना विल्यम्स हिने शिक्षेच्या प्रकरणात दुहेरी मापदंड अवलंबला जातो, असे म्हटले असले तरी आकडेवारी मात्र त्याउलट आहे.
लॉस एंजिल्स : दिग्गज टेनिसपटूसेरेना विल्यम्स हिने शिक्षेच्या प्रकरणात दुहेरी मापदंड अवलंबला जातो, असे म्हटले असले तरी आकडेवारी मात्र त्याउलट आहे. वास्तविकत: पुरुष खेळाडूंना कोर्टवर स्वत:वरील नियंत्रण गमावणे आणि रॅकेट तोडण्याबाबत महिलांच्या तुलनेत जवळपास तीनपट जास्त शिक्षा भोगावी लागली आहे.
न्यूयॉर्क टाइम्सनुसार १९८८ ते २०१८ दरम्यान ग्रँडस्लॅम स्पर्धेत पुरुष खेळाडूंवर १ हजार ५१७ वेळेस दंड लावण्यात आला आहे. तुलनेत महिला खेळाडूंना दंड लावण्याबाबत ५३५ प्रकरणे समोर आली आहेत. या वर्तमानपत्रानुसार गत २० वर्षांदरम्यान झालेल्या १० हजारांपेक्षा जास्त सामन्यात जमवलेल्या आकड्यांनुसार रॅकेट तोडण्याबाबत पुरुष खेळाडूंवर ६४९ वेळेस दंड लावण्यात आला आहे, तर महिलांना फक्त ९९ वेळेस ही शिक्षा देण्यात आली आहे. या आकड्यात ‘असभ्य भाषे’चा उपयोग करण्याच्या प्रकरणात पुरुषांवर ३४४ वेळा दंड लावण्यात आला आहे, तर महिलांवर १४० वेळेस दंड ठोठावण्यात आला आहे. त्याचबरोबर खिलाडूवृत्तीच्या विरुद्ध आचरण करणाऱ्या पुरुष खेळाडूंबाबत २८७ प्रकरणांची नोंद झाली आहे, तर महिलांमध्ये ६७ प्रकरणे समोर आली आहेत.
या आकड्यानुसार पुरुषांना दंड ठोठावला जाण्याच्या घटना जास्त घडल्या आहेत. कारण ग्रँडस्लॅममध्ये त्यांना बेस्ट आॅफ फाईव्ह सामने खेळावे लागतात, तर महिलांना बेस्ट आॅफ थ्री सामनेच खेळावे लागतात. गत आठवड्यात सेरेनाने अमेरिकन ओपनच्या फायनलमध्ये नाओमी ओसाकाविरुद्धच्या लढतीदरम्यान चेअर अंपायर कार्लेस रामोसच्या निर्णयाला विरोध करताना त्यांना ‘खोटारडा’ आणि ‘चोर’ म्हटले होते. एवढेच नव्हे तर तिने मी महिला असल्यामुळे तुम्ही माझ्याविरुद्ध निर्णय देऊ शकता, असे प्रतिक्रियाही तिने व्यक्त केली होती. सामन्यानंतर पत्रकार परिषदेत ती म्हणाली, ‘‘हे योग्य नाही. मी पुरुषांना अंपायरशी अनेक वेळेस असभ्य भाषा बोलताना पाहिले आहे.’’
मी येथे महिलांचा हक्क आणि बरोबरीसाठी लढत आहे. मी त्यांना एक गेम हिसकावून प्रतिस्पर्धी खेळाडूला दिल्यामुळे त्यांना चोर म्हटले. पुरुष खेळाडूंनी कधी चोर म्हटल्यावर त्यांनी कधीही त्यांच्याविरुद्ध गेम दिला नाही. या निर्णयाने मला विचलित केले होते.’’ सेरेनाने सामन्यादरम्यान आपले रॅकेटदेखील तोडले होते आणि पोर्तुगालचा हा अंपायर तिच्या सामन्यात पुन्हा कधी अंपायरिंग करणार नाही अशी धमकीही दिली होती. ओसाकाने या फायनल सामन्यात सेरेनाचा ६-२, ६-४ असा पराभव केला होता.