CoronaVirus News : कोरोनामुळे ‘बिग थ्री’वर परिणाम होणार नाही - विजय अमृतराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 01:38 AM2020-05-21T01:38:44+5:302020-05-21T01:39:36+5:30
CoronaVirus News in Marathi and Live Updates : पुरुषांची एटीपी टूर आॅगस्ट महिन्याआधी सुरू होणार नाही आणि महिलांची डब्ल्यूटीए टूर २० जुलैनंतरच सुरू होईल.
चेन्नई : ‘व्यावसायिक टूरच्या निलंबनामुळे टेनिसच्या ‘बिग थ्री’ खेळाडूंवर कोणताही परिणाम दिसून येणार नाही. पण खरा संघर्ष भारतीयांसह खालच्या क्रमवारीतील खेळाडूंसाठी असेल,’ असे मत भारताचे महान टेनिसपटू विजय अमृतराज यांनी व्यक्त केले.
पुरुषांची एटीपी टूर आॅगस्ट महिन्याआधी सुरू होणार नाही आणि महिलांची डब्ल्यूटीए टूर २० जुलैनंतरच सुरू होईल. याबाबत अमृतराज यांनी रॉजर फेडरर, नोव्हाक जोकोविच आणि राफेल नदाल या स्टार खेळाडूंना आर्थिक कमी किंवा पुढे वाटचाल करण्यास कोणतीही अडचण येणार नसल्याचे मत व्यक्त केले. अमृतराज म्हणाले की, ‘या तीन खेळाडूंवर आर्थिक गोष्टींचा किंवा एटीपी अंकांचा कोणताही दबाव नसेल. त्यांची ग्रँडस्लॅमवरील पकड तगडी आहे. या तिघांनी इतिहास रचला आहे.’ अमृतराज यांनी पुढे सांगितले की, ‘टेनिसविश्वात सर्वांवर परिणाम होईल. विविध क्रमवारी वर्गातील खेळाडूंवर परिणाम होईल. तळाच्या क्रमवारीतील खेळाडूंसाठी पुनरागमन करणे आव्हानात्मक ठरेल. तसेच वयस्कर खेळाडूंची वेळ निघत चालली आहे.’
त्याचप्रमाणे, ‘भारतीय खेळाडूंवरही असाच परिणाम होताना दिसेल. शिवाय टेनिस सुरू झाल्यानंतरही प्रेक्षक मैदानावर जाऊ शकणार नाहीत. हे सर्व प्रत्येक देशातील परिस्थितीवर अवलंबून आहे,’ असेही अमृतराज यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)