डेव्हिस कप : टेनिसपटू रोहन बोपन्नाच्या आक्षेपावर एआयटीएने केले दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 01:29 AM2018-03-12T01:29:43+5:302018-03-12T01:30:36+5:30
एआयटीएने निवड प्रक्रियेपासून खेळाडूंना दूर ठेवण्याचा कडवा इशारा देताना रोहन बोपन्नाच्या आक्षेपानंतरही रविवारी लिएंडर पेसचा डेव्हिस कप संघात समावेश केला.
नवी दिल्ली - एआयटीएने निवड प्रक्रियेपासून खेळाडूंना दूर ठेवण्याचा कडवा इशारा देताना रोहन बोपन्नाच्या आक्षेपानंतरही रविवारी लिएंडर पेसचा डेव्हिस कप संघात समावेश केला.
पाच सदस्यांच्या निवड समितीने युकी भांबरी, रामकुमार रामनाथन, सुमित नागल, बोपन्ना व पेस यांच्याव्यतिरिक्त संघामध्ये राखीव सदस्य म्हणून दिवीज शरण यांचा समावेश केला. अपेक्षेप्रमाणे पूरव राजाला संघातून वगळण्यात आले. कारण कॅनडाविरुद्ध विश्व ग्रुप प्लेआॅफ लढतीत त्याची कामगिरी चांगली झाली नव्हती.
एआयटीच्या सूत्रानी दिलेल्या माहितीनुसार नॉन प्लेर्इंग कर्णधार महेश भूपतीने निवड समितीच्या अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात सिनिअर व्यावसायिक खेळाडू बोपन्ना पेसला आपला डेव्हिस कप विश्वविक्रम नोंदवण्याची संधी मिळावी यासाठी चीनविरुद्धच्या लढतीसाठी संघाबाहेर राहू इच्छितो. या लढतीत पेससोबत जोडी बनविण्यास इच्छुक नसल्याचा संदेश बोपन्ना देऊ इच्छित होता.’
निवड समितीने मात्र बोपन्ना व पेस या दोघांनाही संघात स्थान दिले. त्यामुळे तेनजिनमध्ये ६-७ एप्रिलला होणाºया लढतीत खेळायचे किंवा नाही याचा निर्णय आता बोपन्नाला घ्यायचा आहे.
एआयटीएचा अधिकारीने सांगितले की, ‘शनिवारी कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये या प्रकरणावर चर्चा झाली होती. कर्णधाराच्या मते रोहन बोपन्ना व लिएंडर पेस यांच्यादरम्यान कोर्टवर ताळमेळ नाही. केवळ लिएंडरच बोपन्नाला त्याच्या साथीने खेळविण्यास तयार करू शकतो, असे कर्णधाराला वाटते. त्यासाठी पेसने बोपन्नासोबत चर्चा करायला हवी.’
एआयटीएचे अधिकारी पुढे म्हणाले की, ‘रोहन बोपन्नाचा निर्णय यामध्ये महत्त्वाचा ठरणार आहे. कारण बोपन्नाला अद्याप सरकारी अनुदान मिळते आणि याचा त्याने विचार करायला हवा. वैयक्तिक मतभेद विसरून देशासाठी खेळण्यास नकार देणाºया खेळाडूंचे एआयटीए कधीच समर्थन करणार नाही. त्याला भारतातर्फे वर्षातून दोनदा किंवा तिनदा खेळावे लागू शकते. त्यामुळे केवळ दोन आठवडे वैयक्तिक मतभेद विसरता येणार नाही.’ याआधीएप्रिल २०१७ मध्ये उझबेकिस्तानविरुद्धच्या लढतीतूनही लिएंडर पेसला वगळण्यात आले होते. (वृत्तसंस्था)
बोपन्ना व पेस यांच्यादरम्यान वादाला २०१२ पासून सुरुवात झाली. त्यावेळी लंडन आॅलिम्पिकच्या तयारीसाठी हे दोघे एटीपी टूरमध्ये एकत्र खेळण्याची आशा होती, पण त्यानंतर बोपन्नाने पेससोबत जोडी बनविण्यास नकार दिला आणि एआयटीएला भूपतीसोबत त्याची जोडी बनवावी लागली.
पेसला पुरुष दुहेरी स्पर्धेत विष्णू वर्धनच्या साथीने खेळावे लागले. मिश्र दुहेरीमध्ये सानिया मिर्झाच्या साथीने त्याची जोडी बनविण्यात आली होती. सानियाने त्यावेळी निराशा व्यक्त करताना एआयटीएने पेसला शांत करण्यासाठी माझा प्यादा म्हणून वापर केल्याचे म्हटले होते.
पेस म्हणाला,‘भारतीय संघात पुनरागमन केल्यामुळे खूश आहे. मी कसून मेहनत घेतली असून आपल्या क्रमावारीत सुधारणा केली. मी रोहनसोबत खेळण्यास तयार आहे. आम्ही एक चांगली जोडी बनू शकतो. खेळाडू म्हणून मी रोहनचा आदर करतो.’ बेंगळुरुतील नाट्यानंतर पेस संघाबाहेर होता. कर्णधार महेश भूपतीने सहा सदस्यांच्या संघात त्याचा समावेश असल्यानंतरही त्याला सुरुवातीच्या संघात स्थान दिले नाही. पेस अमेरिकेहून बेंगळुरुमध्ये दाखल झाला होता.
पेसची क्रमवारीत प्रगती
पेसने दुबई एटीपी ५०० स्पर्धेत चमकदार कामगिरी करीत मानांकनामध्ये अव्वल ५० मध्ये पुनरागमन केले. तो सध्या ४६ व्या स्थानी आहे. तो या स्पर्धेत जेमी सेराटानीच्या साथीने उपविजेता ठरला.
शरण मानांकनामध्ये ४४ व्या स्थानी आहे. बोपन्नानंतर (२० वे स्थान) तो दुसरा उच्च मानांकन असलेला खेळाडू आहे. २०१२ नंतर तो संघात परतला आहे.