डेव्हिस कप : लिएंडर पेसच्या विश्वविक्रमी कामगिरीकडे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 01:56 AM2018-04-06T01:56:36+5:302018-04-06T01:56:55+5:30
भारतीय टेनिस संघ नव्या स्वरुपातील डेव्हिस चषक सामन्यासाठी सज्ज झाला असून शुक्रवारी रंगणाऱ्या महत्त्वपूर्ण सामन्यात भारतीयांनी चीनविरुद्ध कंबर कसली आहे. विशेष म्हणजे ओशियाना गटातील या सामन्यावर सा-या टेनिसविश्वाचे लक्ष असेल.
तियानजिन - भारतीय टेनिस संघ नव्या स्वरुपातील डेव्हिस चषक सामन्यासाठी सज्ज झाला असून शुक्रवारी रंगणाऱ्या महत्त्वपूर्ण सामन्यात भारतीयांनी चीनविरुद्ध कंबर कसली आहे. विशेष म्हणजे ओशियाना गटातील या सामन्यावर सा-या टेनिसविश्वाचे लक्ष असेल. कारण, भारताचा दिग्गज खेळाडू लिएंडर पेस याने दुहेरी सामन्यात विजय मिळवल्यास स्पर्धा इतिहास सर्वाधिक दुहेरी सामने जिंकणारा खेळाडू असा विश्वविक्रम पेसच्या नावावर होईल.
४४ वर्षीय पेसने डेव्हिस चषक स्पर्धेत आतापर्यंत एकूण ४२ सामने जिंकले आहेत. इटलीचा निकोला पीट्रांजेली यानेही ४२ सामने जिंकले असून हा विक्रम मोडण्यासाठी पेसला केवळ एका विजयाची गरज आहे. याआधी फेब्रुवारी २०१७ मध्येही पुण्यात झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात पेसला हा विक्रम रचण्याची संधी मिळाली होती. मात्र, त्यावेळी भारतीय संघाने केवळ पुरुष दुहेरीचा सामनाच गमावला होता. त्याचप्रमाणे, उझबेकिस्तानविरुद्ध बंगळुरु येथे झालेल्या सामन्यात कर्णधार महेश भूपतीने पेसला संघाबाहेर ठेवताना श्रीराम बालाजी व रोहन बोपन्ना यांना खेळविले होते.
या दोन सामन्यांतून पेसला घरच्या मैदानावर विश्वविक्रम नोंदवण्याची संधी मिळाली होती. मात्र, आता संघात पुनरागमन केल्यानंतर आणि गेल्या काही सामन्यात चमकदार खेळ केल्यानंतर विदेशामध्ये पेसला हा विक्रम नोंदवण्याची संधी मिळाली आहे. त्याचवेळी, भारतीय संघाला अव्वल एकेरी खेळाडू युकी भांबरीची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवेल. तो दुखापतग्रस्त असल्याने त्याच्या जागी रामकुमार रामनाथन खेळेल. दोन दिवसांच्या या लढतीमध्ये बेस्ट आॅफ फाईव्हच्या ऐवजी बेस्ट आॅफ थ्री सामने खेळवले जातील.
कागदावर भारतीय संघ चीनविरुद्ध नक्कीच मजबूत दिसत आहे. भारताच्या रामकुमार (१३२) आणि सुमित नागल (२१३) यांचे जागतिक मानांकन त्यांचे प्रतिस्पर्धी अनुक्रमे झी झांग (२४७) आणि दी वू (२४८) यांच्याहून खूप सरस आहे. त्याचवेळी चीनचा शानदार युवा खेळाडू यिबिंग वू याच्या खेळाकडे विशेष लक्ष असेल. सध्या तो जागतिक ज्यूनिअर क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. यिबिंग सलामीला रामकुमारविरुद्ध खेळेल. यानंत सुमितचा सामना झांगविरुद्ध होईल. शनिवारी पेस - बोपन्ना या अनुभवी जोडीचा सामना दी वू आणि माओ शिन गोंग यांच्याविरुद्ध होईल. या सामन्यानंतर परतीचे एकेरी सामने रंगतील. (वृत्तसंस्था)
आम्हाला युकीची कमतरता नक्कीच भासेल. त्याने
गेल्या महिन्यात शानदार कामगिरी केली असून तो सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. दुहेरीत मी आणि रोहन मिळून चांगली सांघिक कामगिरी करतो. त्याची ताकद आणि माझे नियंत्रण, त्याची सर्विस आणि माझा नेटजवळचा खेळ
असे मिश्रण चांगले रंगते. मला रोहनसह खेळण्यात
आनंद होईल. - लिएंडर पेस
सामन्याची सुरुवात रामकुमार करणार हे भारतासाठी चांगले ठरेल. त्याच्याकडे खूप अनुभव असून त्याला
चांगला खेळ सादर करावा लागेल. या सामन्यासाठी आव्हानात्मक परिस्थिती असून जे खेळाडू मानसिकरीत्या मजबूत असतील त्यांना फायदा होईल. येथे खूप थंडी आहे.
- महेश भूपती, भारतीय कर्णधार