डेव्हिस चषक ; रामकुमारला सोपा ‘ड्रॉ’, फिटनेसअभावी साकेत बाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 12:53 AM2017-09-16T00:53:09+5:302017-09-16T00:53:22+5:30
कॅनडाविरुद्धच्या डेव्हिस चषक टेनिस लढतीत भारताला पहिल्या दिवशी गुण मिळू शकतो. कारण रामकुमार रामनाथन याला सोपा ‘ड्रॉ’ मिळाला आहे. फिटनेसच्या कारणावरून साकेत मिनेनी संघाबाहेर पडला आहे.
एडमंटन : कॅनडाविरुद्धच्या डेव्हिस चषक टेनिस लढतीत भारताला पहिल्या दिवशी गुण मिळू शकतो. कारण रामकुमार रामनाथन याला सोपा ‘ड्रॉ’ मिळाला आहे. फिटनेसच्या कारणावरून साकेत मिनेनी संघाबाहेर पडला आहे.
विश्व क्रमवारीत १५४ व्या स्थानावर असलेल्या रामकुमारला २०२ व्या स्थानावर असलेल्या ब्राडले शनूरविरुद्ध खेळायचे आहे. त्याचवेळी यूकी भांबरी ५१ व्या स्थानावर असलेला कॅनडाचा खेळाडू डेनिस शापोवालोव याच्याविरुद्ध लढत देईल. कॅनडा संघाने खराब फॉर्ममध्ये असलेला वासेक पोस्पिली याला विश्रांती दिली आहे. एटीपी टूरमध्ये त्याने सलग पाच सामने गमविले.
भारताचा बिगरखेळाडू कर्णधार महेश भूपती हा मिनेनीच्या जागी रोहण बोपन्नासोबत पूरव राजा याला संधी देऊ शकतो. बोपन्ना- राजा ही जोडी डॅनियल नेस्टर- पोस्पिलीविरुद्ध खेळेल. संघात सहभागी असलेल्या राखीव खेळाडूंपैकी एन. श्रीराम बालाजी याच्या पायाला दुखापत झाल्याने राजाला ऐनवेळी संघात स्थान देण्यात आले. अखेरच्या दिवशी परतीच्या सामन्यात यूकी शनूरविरुद्ध तसेच रामकुमार हा शापोवालोवविरुद्ध खेळेल.
‘ड्रॉ’बद्दल भूपतीने समाधान व्यक्त केले. तो म्हणाला,‘ रामकुमारने सुरुवात करावी अशी आमची इच्छा होती.’ दुहेरी जोडी बदलल्याबाबत तो म्हणाला,‘आमचा सर्वोत्कृष्ट संघ दुहेरी संघ आहे. साकेत शारीरिकदृट्या तंदुरुस्त नाही. पायाच्या दुखापतीतून सावरल्यानंतर कोर्टवर उतरलेल्या मिनेनीने पुण्यात न्यूझीलंडविरुद्ध ऐनवेळी माघार घेतली होती. त्यावेळी तत्कालीन कर्णधार आनंद अमृतराज याने ऐनवेळी पेसचा जोडीदार म्हणून विष्णू वर्धनची निवड केली होती. मिनेनी नंतर उझबेकिस्तानविरुद्ध देखील खेळला नव्हता. त्यावेळी बोपन्नाला बालाजीची साथ घ्यावी लागली होती. (वृत्तसंस्था)
सरावाचा लाभ...
भूपती म्हणाला, ‘न्यूयॉर्कमधील सरावाचा खेळाडूंना लाभ झाला. यामुळे स्वत:चे फिटनेस त्यांना कळले, तसेच आत्मविश्वास उंचावण्यास मदत झाली. राफेल नदाल, ज्यो विल्फ्रेड त्सोंगा व मार्टिन डेल पेट्रो यासारख्या दिग्गजांना नमविणाºया शापोवालोवचे यूकीपुढे आव्हान असेल. ‘ विजयासाठी मी सर्वस्व पणाला लावेन’, असे यूकी म्हणाला.