डेव्हिस चषक : रामकुमार जिंकला, युकी पराभूत भारत-कॅनडा १-१ ने बरोबरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 12:23 AM2017-09-17T00:23:27+5:302017-09-17T00:23:50+5:30
युवा टेनिसपटू युकी भांबरीला अथक प्रयत्नांनंतरही पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, रामकुमार रामनाथनचा विजय भारतासाठी दिलासा देणारा ठरला.
एडमंटन : युवा टेनिसपटू युकी भांबरीला अथक प्रयत्नांनंतरही पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, रामकुमार रामनाथनचा विजय भारतासाठी दिलासा देणारा ठरला. त्याच्या विजयानंतर भारताने कॅनडाविरुद्ध डेव्हिस चषक विश्व गट प्लेआॅफ सामन्यात पहिल्या दिवशी १-१ अशी बरोबरी साधली.
जगातील ५१ व्या क्रमांकावर असलेल्या डेनिस शापोवालोवविरुद्ध दोन सेट गमावल्यानंतरही भारताच्या युकी भांबरीने विजयासाठी संघर्ष सुरूच ठेवला होता. मात्र, त्याला ६-७, ४-६, ७-६, ६-४, १-६ ने पराभूत व्हावे लागले. दुसरीकडे, १५४ व्या क्रमांकाचा रामकुमार याने ब्रेडेने शनूर याचा पहिल्या एकेरीतील सामन्यात ५-७, ७-६, ७-५, ७-५ ने पराभव केला. हा सामना तीन तास १६ मिनिटे चालला. शनूर याचा पराभव करीत रामकुमार याने डेव्हिस चषकातील सत्रात आपले विजयी अभियान कायम राखले. दमदार सर्व्हिस ही त्याची ताकद आहे. मात्र, फटक्यातील गती कमी होती.
दुसरीकडे, युकीने आपल्या खेळाने सिद्ध करून दाखवले, की त्याने २२ व्या क्रमांकाचा गाएल मोफिल्स याच्यावर मिळवलेला विजय साधा नव्हता. तो अव्वल खेळाडूंना टक्कर देण्यास सक्षम आहे. सामन्यानंतर भारताचा कर्णधारा महेश भूपती म्हणाला, की मुलांनी चांगला खेळ केला. राम याने गमावलेला सामना जिंकून दिला. युकीसुद्धा विजयाच्या समीप होता. आम्ही अशाच पद्धतीने खेळ केला तर लक्ष्य चांगले असेल. या पराभवाचे दु:ख युकीला काही वेळापुरते राहिले असेल; परंतु त्याने शापोवालोव याच्यावर दबाव आणला होता. (वृत्तसंस्था)