डेव्हिस चषक टेनिस : भारत-पाकलढतीकडे लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 04:26 AM2019-11-29T04:26:19+5:302019-11-29T04:26:43+5:30
शुक्रवारपासून येथे प्रारंभ होत असलेल्या डेव्हिस चषक लढतीत मजबूत भारतीय संघ कमकुवत पाकिस्तान संघाचे आव्हान लीलया पार करण्यात यशस्वी ठरेल, असा विश्वास आहे.
नूर सुल्तान (कजाखस्तान) : शुक्रवारपासून येथे प्रारंभ होत असलेल्या डेव्हिस चषक लढतीत मजबूत भारतीय संघ कमकुवत पाकिस्तान संघाचे आव्हान लीलया पार करण्यात यशस्वी ठरेल, असा विश्वास आहे. ही लढत नाट्यमय परिस्थितीमध्ये तटस्थ स्थळावर आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. स्थळाबाबत अखेरच्या क्षणापर्यंत अनिश्चितता कायम होती. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये खेळाडूंच्या निवडीबाबत साशंकता होती.
अखेर आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने (आयटीएफ) ही लढत नूर-सुल्तानमध्ये आयोजित करण्यात निर्णय घेतला. कारण आयटीएफच्या स्वतंत्र लवादाने पाकिस्तानटेनिस महासंघाचे अपील फेटाळले.
सुमित नागल, रामकुमार रामनाथन व अनुभवी लिएंडर पेस यांच्यासारखे प्रतिभावान खेळाडूंच्या उपस्थितीत भारतीय संघ सहज विजय मिळवेल, अशी आशा आहे, पण पाकिस्तानचे अव्वल खेळाडू ऐसाम उल-हक कुरेशी आणि अकिल खान यांनी माघार घेतल्यामुळे लढत एकतर्फी होणार हेही नक्की. भारतीय खेळाडूंना ग्रँडस्लॅम स्पर्धेचा अनुभव आहे, तर पाकिस्तानचे खेळाडू अद्याप आयटीएफ फ्यूचर्स पातळीच्या स्पर्धेत छाप सोडण्यासाठी संघर्ष करीत आहेत. पण, जोपर्यंत पाकिस्तानचे आघाडीचे खेळाडू खेळत होते तोपर्यंत दुहेरीमध्ये प्रतिस्पर्धा होती, पण लढतीचे स्थळ बदलण्याच्या विरोधात त्यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे ही प्रतिस्पर्धाही संपली.
पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ज्युनिअर खेळाडूंना या लढतीच्या निमित्ताने शिकण्याची संधी मिळेल. या लढतीतील विजेता संघ मार्च महिन्यात क्रोएशियामध्ये होणाºया २०२० च्या विश्व ग्रुप क्वालिफायरसाठी पात्र ठरेल. ४६ वर्षीय पेसला सर्वाधिक दुहेरी सामने जिंकण्याच्या आपला डेव्हिस चषकमधील विक्रमामध्ये सुधारणा करण्याची संधी आहे. तो ४३ विजयांसह अव्वल स्थानी आहे. हा विक्रम त्याने गेल्या वर्षी चीनविरुद्ध खेळताना नोंदवला होता.
१८ ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावणारा पेस डेव्हिस चषकामध्ये पदार्पण करणाºया जीवन नेदुनचेझियानच्या साथीने खेळणार आहे. जीवन डेव्हिस चषक खेळणारा भारताचा ७५ वा खेळाडू असेल. फॉर्मात असलेल्या नागलकडे पहिला डेव्हिस चषक विजय नोंदवण्याची संधी आहे. कारण त्याने स्पेन (२०१६) व चीन (२०१८) यांच्याविरुद्ध एकेरीच्या दोन्ही लढती गमाविल्या होत्या. रामकुमार दुस-या क्रमांकाचा एकेरीचा खेळाडू म्हणून खेळेल. तो जय-पराजयाची आकडेवारी सुधारण्याचा प्रयत्न करेल. (वृत्तसंस्था)
पाकिस्तानला सहज नमवू - कर्णधार
रामकुमार शुक्रवारी मोहम्मद शोएबविरुद्धच्या लढतीने सुरुवात करेल. शोएबला आयटीएफ फ्यूचर्स स्पर्धेच्या मुख्य ड्रॉमध्ये अद्याप एकही विजय मिळवता आलेला नाही. एकेरीच्या दुसºया लढतीत नागलचा सामना हुजाएफा अब्दुल रहमानसोबत होईल. त्याने ज्युनिअर आयटीएफ सर्किटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. भारताचा कर्णधार रोहित राजपाल म्हणाला की, ‘पाकला व्हॉईटवॉश देण्याची आशा आहे. त्यांच्या संघात युवा खेळाडूंचा समावेश असून ते मजबूत भारतीय संघाविरुद्ध खेळतील. त्यांच्याकडे गमाविण्यासारखे काही नाही. ते झुंजार असून अखेरपर्यंत लढतील, असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितल्याचे मला कळले आहे. आम्ही सफाया करण्याचा प्रयत्न करू.’
शून्य अंशापेक्षा कमी तापमान असल्यामुळे लढत इंडोर हार्डकोर्टवर खेळली जाणार आहे. शनिवारी लढतीच्या दुसºया दिवशी पेस व जीवन यांची लढत शोएब व हुजाएफा यांच्यासोबत होईल. भारताने ३-०
अशी विजयी आघाडी घेतली, तरी चौथी लढत खेळली जाईल. संघांकडे पाचवी लढत न खेळण्याचा पर्याय आहे. लढत भारतीय वेळेनुसार शुक्रवारी दुपारी १.३० वाजता आणि शनिवारी
११.३० वाजता सुरू होईल.