डेव्हिस चषक टेनिस : आयटीएफने पाकचे अपील फेटाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 01:37 AM2019-11-20T01:37:16+5:302019-11-20T01:37:18+5:30

भारताविरुद्धची लढत नूर सुल्तानमध्ये होणार

Davis Cup Tennis: ITF rejects Pak's appeal | डेव्हिस चषक टेनिस : आयटीएफने पाकचे अपील फेटाळले

डेव्हिस चषक टेनिस : आयटीएफने पाकचे अपील फेटाळले

Next

नवी दिल्ली : भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध डेव्हिस कप लढत नूर सुल्तानमध्ये खेळेल. कारण आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने (आयटीएफ) पाकिस्तानचे अपील फेटाळताना कजाखस्तानच्या राजधानीला या लढतीचे यजमानपद सोपविले. पाकिस्तान टेनिस महासंघाने या लढतीचे स्थान बदलण्याच्या निर्णयाविरुद्ध अपील केले होते. त्यांनी म्हटले होते की, जर भारतीय यात्रेकरू सुरक्षेबाबत कुठली चिंता न करता पाकिस्तानमध्ये येऊ शकतात, तर भारतीय संघ इस्लामाबादमध्ये सामना का खेळू शकत नाही.’

आयटीएफच्या स्वतंत्र लवादाने ४ नोव्हेंबरला डेव्हिस चषक समितीतर्फे घेण्यात आलेल्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. आयटीएफने म्हटले की, ‘पाकिस्तान टेनिस महासंघाने इस्लामाबादहून सामना अन्यत्र स्थानांतरित करण्याच्या डेव्हिस कप समितीच्या निर्णयाविरुद्ध अपील केले होते. स्वतंत्र लवादाने १८ नोव्हेंबरला हे अपील फेटाळले.’ त्यात म्हटले गेले की, ‘पीटीएफने तटस्थ स्थळाचा उल्लेख केला नव्हता. त्यामुळे डेव्हिस कप नियमानुसार डेव्हिस कप समितीने नूर सुल्तान (पूर्वीचे अस्ताना) या शहराची यजमानपदासाठी निवड केली. येथे २९-३० नोव्हेंबरला ही लढत होईल.’

सामने इडोअरमध्ये होतील कारण सध्या तेथे कडाक्याची थंडी आहे. भारताचे प्रशिक्षक जीशान अली म्हणाले,‘इनडोअरमध्ये खेळणे आमच्या खेळाडूंसाठी लाभदायक आहे. हा निर्णय आमच्यासाठी अनुकूल असेल. आमचे खेळाडू ग्रासकोर्टवर खेळू शकत नाही, असे नाही, पण हार्डकोटवर खेळणे त्यांना अधिक आवडते. तेथे सध्या खूप थंडी असेल. त्यामुळे आम्ही बंदिस्त स्टेडियममध्ये खेळू.’ (वृत्तसंस्था)

लढत २९-३० नोव्हेंबरला खेळली जाणार आहे. पूर्वघोषित कार्यक्रमानुसार ही लढत सप्टेंबरमध्ये होणार होती, पण उभय देशांदरम्यानच्या राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर खेळाडूंच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करताना भारताने लढत तटस्थ स्थळी आयोजित करण्याची मागणी केली होती. भारताने या लढतीसाठी मजबूत संघ जाहीर केला होता. कारण पाकिस्तानला जाण्यास नकार देणारे आघाडीचे सर्व खेळाडू तटस्थ स्थळावर खेळण्यास तयार आहेत.

भारताचे नेतृत्व सुमित नागल व रामकुमार रामनाथन करतील. लिएंडर पेस व जीवन नेदुचेझियान दुहेरीत खेळतील. रोहन बोपन्नाने खांद्याच्या दुखापतीमुळे लढतीतून माघार घेतली. जीशान म्हणाले की, ‘बोपन्नाच्या माघारीनंतर दुहेरीच्या तीन स्पेशालिस्ट खेळाडूंची निवड करण्याचा निर्णय समजदारीचा होता, हे सिद्ध झाले आहे. स्पेशालिस्ट खेळाडूंना राखीव म्हणून घेऊन जाण्याचा निर्णय योग्यच होता. बोपन्नाच्या स्थानी आता जीवन खेळेल. आम्ही अंतिम पाचची घोषणा करू शकत नाही, पण जीवन खेळेल. आम्हाला रोहनची उणीव भासेल.’

Web Title: Davis Cup Tennis: ITF rejects Pak's appeal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.