डेल पोत्रो मेक्सिको ओपनचा चॅम्पियन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 02:01 AM2018-03-05T02:01:54+5:302018-03-05T02:01:54+5:30
जुआन मार्टिन डेल पोत्रोने केविन अँडरसनचा ६-४, ६-४ असा पराभव करीत मेक्सिको ओपन चषकावर आपले नाव कोरले. हा त्याचा २१ वा एटीपी किताब ठरला. तसेच त्याने आफ्रिकेच्या अँडरसनविरुद्ध खेळताना आपला सातवा विजय नोंदवला.
अकापुलको (मेक्सिको) : जुआन मार्टिन डेल पोत्रोने केविन अँडरसनचा ६-४, ६-४ असा पराभव करीत मेक्सिको ओपन चषकावर आपले नाव कोरले. हा त्याचा २१ वा एटीपी किताब ठरला. तसेच त्याने आफ्रिकेच्या अँडरसनविरुद्ध खेळताना आपला सातवा विजय नोंदवला. प्रिन्सेस मुंडो इम्पिरियल येथील हार्ड कोर्ट टूर्नामेंटमध्ये लेसिया सुरेंकोने महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात स्टेफनी वोगेले हिचा ५-७, ७-६, ६-२ असा पराभव करीत विजेतेपद पटकावले. हा तिचा चौथा डब्ल्यूटीए किताब आहे.
जागतिक मानांकनात नवव्या स्थानावर असलेल्या डेल पोत्रोने अर्जेंटिनाच्या मिशा ज्वेरेव, चार वेळा अकापुलको चॅम्पियन ठरलेल्या डेव्हिड फेरर, सहाव्या रँकिंगवर असलेल्या डॉमनिक थिएम आणि पाचव्या रँकिंगवर असलेल्या अॅलेक्झेंडर ज्वेरेव यांचा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली होती. आठव्या स्थानावर असलेल्या अँडरसनने नुकतेच न्यूयॉर्क ओपनमध्ये विजेतेपद पटकावले होते. हा त्याच्या करिअरमधील चौथा किताब होता. पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात ब्रिटनच्या जेमी मुर्रे आणि ब्राझीलच्याब्रुनो सोरेस या जोडीने विजेतेपद पटकावले. त्यांनी अमेरिकेच्या बॉब आणि माइक ब्रायन या जोडीचा ७-६, ७-५ असा पराभव केला. तर महिला दुहेरीमध्ये जर्मनीच्या तातजाना मारिया आणि ब्रिटनच्या हीथर वॅटसन या जोडीने चषकावर नाव कोरले. या दोघींची एकत्र खेळताना ही पहिलीच स्पर्धा होती. त्यांनी अमेरिकेच्या कॅटलिन क्रिस्टियन आणि सबरीना संतामारियाला ७-५, २-६, १0-२ ने मात दिली.