उल्हासनगरातील कलानी महलात शरद पवार व पप्पू कलानी यांची चर्चा
By सदानंद नाईक | Published: February 12, 2024 08:40 PM2024-02-12T20:40:02+5:302024-02-12T20:40:23+5:30
ओमी कलानींची भविष्यवाणी ठरली खोटी, पप्पू कलानी राजकारणात सक्रिय?
उल्हासनगर : दसरा मैदानात आयोजित केलेल्या एल्गार सभेपुर्वी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी थेट कलानी महल गाठून माजी आमदार पप्पु कलानी यांच्या भेटीला गेले. यावेळी दोन्ही नेत्यात गुप्तगु चर्चा झाली असून यावेळी पक्षनेते नेते जितेंद्र आव्हाड, पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पंचम कलानी यांच्यासह स्थानिक नेते उपस्थित होते.
उल्हासनगरावर गेली तीन दशके राजकीय छाप पडणारे माजी आमदार पप्पु कलानी राजकारणाच्या प्रवाहा बाहेर असून राजकीय निर्णय मीच घेत असल्याची मुलाखत युवानेते ओमी कलानी यांनी एका चॅनेलला दिली होती. तसेच येणाऱ्या विधानसभेत मी उमेदवार असल्याचे संकेत दिले होते. ओमी कलानी यांच्या वक्तव्याने पप्पु कलानी यांनी राजकीय निवृत्ती घेतली का? असा प्रश्न निर्माण झाला होता. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी दसरा मैदानातील एल्गार सभेपूर्वी कलानी महल गाठून माजी आमदार पप्पु कलानी यांची भेट घेतली. यावेळी नेते जितेंद्र आव्हाड, पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पंचम कलानी, ओमी कलानी यांच्यासह जुने पदाधिकारी उपस्थितीत होते. यावेळी पवार व कलानी यांच्या मध्ये राजकीय गुप्तगु झाली असून कलानी पुन्हा राजकारणात सक्रिय झाले असल्याचे बोलले जात आहे.
शरद पवार यांनी तब्बल ४० वर्षानंतर कलानी महल यांना भेट दिली असून १० वर्षांपूर्वी पक्षाच्या माजी जिल्हाध्यक्षा व पक्षाचे उमेदवार ज्योती कलानी यांच्या प्रचाराला गोलमैदानातील सभेला आले होते. यावेळी मोदी लाट असूनही ज्योती कलानी ह्या आमदार पदी निवडून आल्या होत्या. कलानी कुटुंब नेहमी प्रमाणे शरद पवार यांच्या पाठीमागे उभे राहतात की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मागे उभे राहतात. हे लवकरच उघड होणार आहे. कलानी महल मध्ये स्वतःहून शरद पवार गेल्याने, शहरातील राजकारणाला गती मिळते का? याबाबत चर्चेला ऊत आला आहे.