जोकोव्हीचला ऑस्ट्रेलियाने प्रवेश नाकारला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2022 05:41 AM2022-01-07T05:41:09+5:302022-01-07T05:41:24+5:30
जोकोव्हीचने मंगळवारीच सांगितले होते की, त्याला लसीकरणाचा तपशील दाखविण्यापासून सूट देण्यात आली आहे.
ब्रिस्बेन : ऑस्ट्रेलियन ओपन जिंकून विक्रमी २१ वे ग्रँडस्लॅम पटकावण्याच्या प्रयत्नात असलेल्या नोव्हाक जोकोव्हीचच्या स्वप्नांना सुरुंग लागला आहे. कोरोनाविरोधी लसीकरणातून सूट मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करु न शकल्याने व्हिक्टोरिया सरकारकडून त्याचा व्हिसा रद्द करण्यात आला.
जोकोव्हीचने मंगळवारीच सांगितले होते की, त्याला लसीकरणाचा तपशील दाखविण्यापासून सूट देण्यात आली आहे. त्यानंतर तो बुधवारी रात्री उशिरा ऑस्ट्रेलियात दाखल झाला. मात्र, त्याला विमातळावरच थांबविण्यात आले. यावेळी आवश्यक कागदपत्रे नसल्याने विमानतळ अधिकाऱ्यांनी त्याला सोडण्यास नकार दिला. ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॅरिसन म्हणाले, ‘नियम हे स्पष्ट आहेत. आरोग्यासंबंधी कारणांवर तुम्हाला जर सूट हवी असेल तर तुमच्याकडे आवश्यक कागदपत्रे असायला हवी. ती जोकोव्हीचकडे नव्हती. त्यामुळे आम्हाला त्याला रोखण्याशिवाय पर्याय नव्हता.