सानियाला फेड कप हार्ट पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 04:34 AM2020-05-12T04:34:41+5:302020-05-12T04:34:48+5:30
आई झाल्यानंतर कोर्टवर यशस्वी पुनरागमन केल्यामुळे सानिया या पुरस्काराची मानकरी ठरली. सानियाला आशिया ओशियाना विभागासाठी हा पुरस्कार देण्यात आला.
नवी दिल्ली : टेनिस स्टार सानिया मिर्झा सोमवारी फेड कप हार्ट पुरस्कार पटकाविणारी पहिली भारतीय ठरली आहे. आई झाल्यानंतर कोर्टवर यशस्वी पुनरागमन केल्यामुळे सानिया या पुरस्काराची मानकरी ठरली. सानियाला आशिया ओशियाना विभागासाठी हा पुरस्कार देण्यात आला. तिला एकूण १६९८५ पैकी १० हजारापेक्षा अधिक मते मिळाली. हा पुरस्कार चाहत्यांच्या मतांच्या आधारावर देण्यात येतो. यासाठी १ मे पासून मतदान सुरू झाले. सानियाला एकूण ६० टक्के मते मिळाली. फेड कप हार्ट पुरस्कार पटकाविणारी पहिली भारतीय ठरणे अभिमानाची बाब आहे, अशी प्रतिक्रिया अखिल भारतीय टेनिस महासंघाने व्यक्त केली. या पुरस्कारासाठी २ हजार डॉलर मिळतात. सानियाने ही रक्कम तेलंगण मुख्यमंत्री साहाय्यता निधीला दान दिली.
इतर वेचक बातम्या
चीनने पटकावला आॅनलाईन नेशन्स कप
चेन्नई : अव्वल मानांकित चीनला फायनलमध्ये अमेरिकेविरुद्ध २-२ ने बरोबरीवर समाधान मानावे लागले असले तरी साखळी फेरीत सर्वाधिक गुणांची कमाई केल्यामुळे त्यांनी आॅनलाईन नेशन्स कप बुद्धिबळ स्पर्धेत जेतेपदाचा मान मिळवला. सहा संघांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत भारतीय संघाला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले.
सरकारसोबत काम करीत आहोत : ईसीबी
लंडन : इंग्लंड अॅण्ड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) म्हटले आहे की, कोविड-१९ महामारीनंतरही क्रिकेट सुरळीतपणे सुरू व्हावे यासाठी ब्रिटिश सरकारसोबत काम करीत आहोत.
बुधवारपासून टेनिस कोर्ट उघडण्याची शक्यता
लंडन : ब्रिटिश सरकारने म्हटले आहे की, इंग्लंडमध्ये टेनिस कोर्ट व गोल्फ कोर्स बुधवारपासून पुन्हा सुरू होऊ शकतात.