फेडररची ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्य फेरीत धडक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2018 05:17 PM2018-01-24T17:17:56+5:302018-01-24T17:20:01+5:30
गतविजेत्या रॉजर फेडररने ऑस्ट्रेलियन ओपनमधील विजयी घोडदौड कायम राखत स्पर्धेच्या उपांत्या फेरीत प्रवेश केला. बुधवारी झालेल्या उपांत्यपूर्व लढतीत फेडररने थॉमस बर्डिचवर ७-६(१), ६-३, ६-४ अशा फरकाने मात केली.
मेलबर्न - गतविजेत्या रॉजर फेडररने ऑस्ट्रेलियन ओपनमधील विजयी घोडदौड कायम राखत स्पर्धेच्या उपांत्या फेरीत प्रवेश केला. बुधवारी झालेल्या उपांत्यपूर्व लढतीत फेडररने थॉमस बर्डिचवर ७-६(१), ६-३, ६-४ अशा फरकाने मात केली.
उत्तरार्धात एकतर्फी झालेल्या या लढतीमध्ये सुरुवातीला बर्डिचने फेडररला कडवी झुंज दिली. त्यामुळे पहिल्या सेटमध्ये फेडरर पिछाडीवर पडला होता. मात्र फेडररने सर्व अनुभव पणाला लावत पिछाडी भरून काढली आणि टायब्रेकरपर्यंत गेलेला पहिला सेट ७-६(१) अशा फरकाने जिंकला.
पहिला सेट जिंकून सामन्यात आघाडी घेतल्यानंतर फेडररने मागे वळून पाहिले नाही. त्याने दुसऱ्या सेटमध्ये ६-३ आणि तिसऱ्या सेटमध्ये ६-४ अशा फरकाने बाजी मारत सामन्यावर सरळ सेटमध्ये कब्जा केला.
तत्पूर्वी मंगळवारी झालेल्या लढतींमध्ये आघाडीच्या खेळाडूंना धक्का बसला. जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू स्पेनच्या राफेल नदालला दुखापतीमुळे सामना अर्धवट सोडावा लागल्याने उपांत्यपूर्व फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. विशेष म्हणजे त्याने नुकताच गुडघा दुखापतीतून सावरून दिमाखात पुनरागमन केले होते. क्रोएशियाच्या मरिन सिलिच याच्याविरुद्ध रंगलेल्या अत्यंत चुरशीच्या सामन्यात पाचव्या सेटमध्ये ०-२ असा पिछाडीवर पडल्यानंतर नदालला दुखापतीमुळे खेळणे कठीण झाले आणि त्याने माघार घेण्याचा निर्णय घेतला.३ तास ४७ मिनिटांपर्यंत रंगलेल्या या संघर्षामध्ये जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी असलेल्या चिलिचने नदालला चांगलेच झुंजवले.
सामन्यात ६-३, ३-६, ७-६, २-६, ०-२ असा पिछाडीवर पडल्यानंतर उजव्या मांडीचे स्नायू आखडल्याने नदालने माघार घेण्याचा निर्णय घेतला. यासह नदालची चिलिचविरुद्ध सलग सहा विजयांची मालिका खंडित झाली. आता उपांत्य फेरीत चिलिचपुढे जायंट किलर ठरलेल्या ब्रिटनच्या काएल एडमंडचे कडवे आव्हान असेल.
जागतिक मानांकनात तिस-या क्रमांकावर असलेला ग्रिगोर दिमित्रोव आणि महिलांमध्ये चौथ्या क्रमांकावरील एलिना स्वेतलाना या दिग्गज खेळाडूंना मंगळवारी जबर धक्का बसला. या दोघांनाही बिगरमानांकित खेळाडूंकडून पराभूत व्हावे लागले. दिमित्रोवला इंग्लंडच्या काइल एडमंडने, तर स्वेतलानाला एलिसे मर्टेन्स हिने पराभूत केले. स्पर्धेतील हा मोठा उलटफेर ठरला.
विश्वमानांकनात ४९ व्या स्थानावरील एडमंडने दिमित्रोवचा एक तास ४९ मिनिटे चाललेल्या सामन्यात ६-४, ३-६, ६-३, ६-४ ने पराभव करीत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला. ग्रॅण्डस्लॅमच्या सेमी फायनलमध्ये पोहोचणारा एडमंड सहावा ब्रिटिश खेळाडू आहे.आता त्याचा सामना मरिन सिलीचशी होईल. विजयानंतर एडमंड खूप खूश झाला. अशा निकालाने मलाही आनंद झाला आहे. राड लोवर एरिनामध्ये माझा हा पहिलाच सामना होता आणि तो खास राहिला.
महिला गटात, ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत पहिल्यांदाच खेळणाºया बिगरमानांकित बेल्जियमच्या एलिसे मर्टेन्सने जगात चौथ्या क्रमांकाच्या युक्रेनच्या एलिना स्वेतलानाचा पराभव केला. हा सामना एक तास १३ मिनिटे चालला. तिने स्वेतलानावर ६-४, ६-० ने सरळ सेटमध्ये मात केली. मर्टेन्सने आतापर्यंत एकही सेट गमावलेला नाही. अंतिम चारमध्ये पोहोचणारी ती बेल्जियमची पहिली खेळाडू आहे. आता तिचा सामना दुसºया मानांकित कॅरोलिन वोज्नियाकी किंवा कार्ला सुआरेजविरुद्ध होईल.