फेडररच्या पराभवामुळे अमेरिकन ओपनमध्ये सहाव्यांदा हुकला 'फेडाल' सामना
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2017 11:52 AM2017-09-07T11:52:29+5:302017-09-07T11:56:33+5:30
पुन्हा एकदा, तब्बल सहाव्यांदा, युएस ओपन टेनिस स्पर्धेत रॉजर फेडरर विरुध्द राफेल नदाल हा 'फेडाल' नावाने ओळखला जाणारा बहुप्रतिक्षित सामना अगदी थोडक्यात हुकला.
- ललित झांबरे
जळगाव, दि. 7 - पुन्हा एकदा, तब्बल सहाव्यांदा, युएस ओपन टेनिस स्पर्धेत रॉजर फेडरर विरुध्द राफेल नदाल हा 'फेडाल' नावाने ओळखला जाणारा बहुप्रतिक्षित सामना अगदी थोडक्यात हुकला. या दोन्ही ग्रेट खेळाडूंची युएस ओपनच्या उपांत्य फेरीत लढत होण्याची शक्यता होती, परंतु रॉजर फेडररच्या उपांत्यपूर्व फेरीतील धक्कादायक पराभवाने ती पुन्हा एकदा मावळली.
नदालने रशियाच्या आंद्रे रुबलेवचा सरळ सेटमध्ये धुव्वा उडवत उपांत्य फेरी गाठली पण इकडे फेडररला मात्र अर्जेंटिनाच्या 28 व्या मानांकित युआन मार्टिन डेल पोट्रो याने उपांत्यपूर्व फेरीतच बाद केले आणि 2009 मधील धक्कादायक विजयाची पुनरावृत्ती केली. डेल पोट्रोने दोन तास 50 मिनिटात तिसऱ्या मानांकित फेडररला 7-5, 3-6, 7-6, 6-4 अशी हार पत्करायला लावली.
युएस ओपनच्या इतिहासात 'फेडाल'चा सामना होण्याचा योग अद्याप एकदाही आलेला नाही. सहा वेळा हुकलेल्या संधीपैकी चार वेळा फेडररच्या पराभवाने 'फेडाल' सामना होता होता राहिला. सद्यस्थितीत आंतरराष्ट्रीय टेनिसमधील या सर्वात यशस्वी दोन खेळाडूंमध्ये आतापर्यंत एकुण 37 आणि ग्रँड स्लॅम स्पर्धात 12 सामने झालेले असले तरी आतापर्यंत एकदाही ते युएस ओपनमध्ये समोरासमोर आलेले नव्हते. 2008 पासून आतापर्यंत युएस ओपनमध्ये त्यांचा आमनासामना होण्याचा योग अगदी थोडक्यात हुकण्याची ही सहावी वेळ आहे.
2008, 2009, 2010, 2011, 2013 पाठोपाठ यंदा फेडरर-नदाल लढत होण्याची शक्यता होती पण या दोघांपैकी कुणी ना कुणी नेमका आदल्या फेरीत पराभूत झाल्याने ती संधी हुकली होती. ती संधी कशी हुकली ते पहा...
2008- अंतिम फेरीत फेडाल सामन्याची शक्यता होती. दोघांनीही उपांत्य फेरी गाठलेली होती. उपांत्य फेरीत फेडररने चार सेटमध्ये जोकोवीचला हरवलेसुध्दा परंतु दुसऱ्या उपांत्य सामन्यात नदालचा चार सेटमध्ये अँडी मरेकडून पराभूत झाला आणि अंतिम फेरीत फेडाल सामन्याची संधी हुकली.
2009- पुन्हा एकदा अंतिम फेरीत फेडालची शक्यता होती परंतु लागोपाठ दुसऱ्या वर्षी नदाल उपांत्य फेरीत पराभूत झाला तर फेडररने अंतिम फेरी गाठली. नदालला अंतिम विजेत्या युआन मार्टिन डेल पोर्टोने सरळ सेटमध्ये मात दिली तर फेडररने उपांत्य सामन्यात जोकोविचला हरवले होते.
2010 - यावेळी उलट झाले. उपांत्य फेरीत नदाल जिंकला आणि फेडरर हरल्याने पुन्हा एकदा फेडाल हुकले. नदालने अंतिम फेरी गाठण्यासाठी मिखाईल युझ्नीला मात दिली तर तिकडे जोकोविचने पाच सेटपर्यंत रंगलेल्या सामन्यात दोन मॅच पॉईंट वाचवून फेडररचे आव्हान संपवले.
2011- लागोपाठ दुसऱ्या वर्षी जोकोविचने पाच सेटपर्यंत रंगलेल्या सामन्यात पुन्हा एकदा दोन मॅच पॉईंट वाचवून फेडररचे आव्हान उपांत्य फेरीतच संपवले आणि सलग चौथ्या वर्षी फेडाल सामन्याची संधी हुकली. तिकडे दुसऱ्या उपांत्य सामन्यात नदालने चार सेटमध्ये अँडी मरेला हरवून अंतिम फेरीत धडक मारली.
2013- यावर्षी फेडरर व नदाल यांची लढत ड्रॉ नुसार अंतिम फेरीत न होता उपांत्यपूर्व फेरीतच होण्याची शक्यता होती परंतु पुन्हा एकदा फेडररच्या चौथ्याच फेरीतील पराभवाने ती संधी हुकली. फेडररला स्पेनच्या टॉमी रॉब्रेडोने सरळ सेटमध्ये 7-6, 6-4, 6-4 असा पराभवाचा धक्का दिला. तिकडे चौथ्या फेरीच्या दुसऱ्या एका सामन्यात नदालने फिलीप कोलश्रायबरला मात देत उपांत्यपूर्व फेरी गाठली आणि फेडररला ज्याने हरवले होते त्या टॉमी रॉब्रेडोचा उपांत्यपूर्व फेरीत 6-0, 6-2, 6-2 असा अक्षरशः धुव्वा उडवला होता.
2017 -यंदा स्पेनच्या राफेल नदालने अपेक्षेप्रमाणे रशियाच्या आंद्रे रुबलेववर सहज विजय मिळवत युएस ओपनच्या उपांत्य फेरीत धडक दिली. नदालने हा एकतर्फी सामना एक तास 37 मिनिटांत 6-1, 6-2,6-2 असा जिंकला. तिकडे दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात अर्जेंटिनाच्या युआन मार्टिन डेल पोट्रोने चार सेटमध्ये फेडररला मात देत पुन्हा एकदा फेडालची शक्यता धुळीस मिळवली.