सलाम फेडरर... ऑस्ट्रेलियन ओपन जिंकून २० व्या ग्रँडस्लॅम ट्रॉफीवर कोरलं नाव!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2018 05:10 PM2018-01-28T17:10:36+5:302018-01-28T18:18:26+5:30
तो आला, जिद्दीनं खेळला-लढला आणि झोकात जिंकला... टेनिसचा अनभिषिक्त सम्राट रॉजर फेडररच्या शिरपेचात आज आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
मेलबर्नः तो आला, जिद्दीनं खेळला-लढला आणि झोकात जिंकला... टेनिसचा अनभिषिक्त सम्राट रॉजर फेडररच्या शिरपेचात आज आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत विजयाचा 'षटकार' लगावून स्वित्झर्लंडच्या ३६ वर्षीय फेडररनं कारकिर्दीतील विक्रमी २०व्या ग्रँडस्लॅम ट्रॉफीवर नाव कोरलं. तब्बल तीन तास चाललेल्या झंझावाती सामन्यात क्रोएशियाच्या मारीन चिलिचवर फेडररने ६-२, ६-७, ६-३, ३-६, ६-१ अशी मात केली.
सार्वकालिक महान टेनिसपटूंच्या यादीत रॉजर फेडररनं मानाचं स्थान मिळवलं आहे. २०१७ मध्ये, वयाच्या ३५ व्या वर्षी ऑस्ट्रेलियन ओपन आणि विम्बल्डन अशा दोन स्पर्धा जिंकण्याची किमया करून त्यानं टेनिसप्रेमींना अक्षरशः 'याड' लावलं होतं. वयासोबत फेडररचा खेळ अधिकाधिक उंचावत चालल्याचं यंदाच्या मोसमातील पहिल्या ग्रँडस्लॅम स्पर्धेतून पुन्हा स्पष्ट झालंय. तरुणांना लाजवेल असा खेळ करत, झुंजार चिलिचची पाच सेटची झुंज मोडून काढत फेडररनं सहाव्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन जिंकली. हे त्याचं २० वं ग्रँडस्लॅम जेतेपद आहे आणि हा पराक्रम करणारा तो एकमेवाद्वितीय पुरुष टेनिसपटू आहे.
मारीन चिलिचविरुद्धच्या सामन्यात स्वाभाविकच रॉजर फेडररचं पारडं जड होतं. पहिला सेट त्यानं अशा थाटात जिंकला की तीन सेटमध्ये चिलिचचा 'खेळ खल्लास' होणार असंच वाटलं. पण, दुसऱ्या सेटमध्ये धुमशान खेळ करत चिलिचनं आपले इरादे स्पष्ट केले. हा सेट त्यानं टायब्रेकरमध्ये जिंकला. त्यानंतर, तिसऱ्या सेटमध्ये फेडररनं कमबॅक केलं. त्यानं चिलिचला डोकं वर काढायची संधीच दिली नाही. त्याच जोशात त्यानं चौथ्या सेटलाही सुरुवात केली होती. चिलिचची सर्व्हिस भेदून त्याने आघाडी घेतली होती. पण, चिलिचनं ताकदवान फटक्यांचा मारा करत पिछाडी भरून काढली आणि बघता-बघता सेटच खिशात टाकला. या सेटमध्ये फेडररकडून झालेल्या चुका पाहून चाहत्यांची धडधड चांगलीच वाढली होती.
पाचव्या सेटमध्ये पहिल्यांदा सर्व्हिस करायची संधी रॉजर फेडररच्या पथ्यावर पडली. एक वेगळाच उत्साह त्याच्यात संचारलेला पाहायला मिळाला आणि त्याच्यापुढे चिलिच फिका पडला.
वय हा फक्त एक आकडा असतो, जिद्द आणि चिकाटी असली की अशक्य काहीच नाही, हेच रॉजर फेडररनं ही स्पर्धा जिंकून सिद्ध केलं आहे. आता फेडररच्या नावावर ऑस्ट्रेलियन ओपनची सहा, विम्बल्डनची आठ, फ्रेंच ओपनची एक आणि अमेरिकन ओपनची पाच जेतेपदं आहेत.
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
— #AusOpen (@AustralianOpen) January 28, 2018
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆@RogerFederer, 2⃣0⃣x Grand Slam champion.#AusOpenpic.twitter.com/l1oskAwzMU
फेडररला अश्रू अनावर
गेल्या काही वर्षात कुठलीही ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्यानंतर फेडररच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळतात, हे चाहत्यांना ठाऊकच आहे. पण, आज हे अश्रू थांबतच नव्हते. ऑस्ट्रेलियन ओपनची झळाळती ट्रॉफी स्वीकारल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना त्याचा कंठ दाटून येत होता. शेवटी आपल्या टीमचे, कुटुंबाचे आभार मानताना तर त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहायला लागले. ते कितीतरी वेळ थांबतच नव्हते.
२० स्लॅम क्लब
तीन महिला टेनिसपटूंनी एकेरीची २० हून अधिक ग्रँडस्लॅम जेतेपदं पटकावण्याची किमया केली आहे. मार्गारेट कोर्ट यांच्या नावावर सर्वाधिक २४ जेतेपदं असून सेरेना विल्यम्सनं २३, तर स्टेफी ग्राफनं २२ ग्रँडस्लॅम ट्रॉफींवर नाव कोरलंय. या क्लबमध्ये रॉजर फेडररच्या रूपाने पुरुष टेनिसपटूनं प्रवेश केला आहे.