टेनिससुंदरी शारापोव्हाने घेतली निवृत्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2020 02:04 AM2020-02-27T02:04:43+5:302020-02-27T07:07:54+5:30

गेल्या काही स्पर्धांपासून हरपला होता फॉर्म

Five time Grand Slam winner Maria Sharapova announces her retirement from tennis | टेनिससुंदरी शारापोव्हाने घेतली निवृत्ती

टेनिससुंदरी शारापोव्हाने घेतली निवृत्ती

Next

पॅरिस : पाच वेळची ग्रँडस्लॅम विजेती दिग्गज टेनिसपटू रशियाच्या मारिया शारापोव्हाने बुधवारी अचानकपणे व्यावसायिक खेळाडू म्हणून निवृत्ती जाहीर करताना क्रीडाविश्वाला धक्का दिला. क्रीडाविश्वातील दिग्गज आणि नावाजलेल्या खेळाडूंमध्ये शारापोव्हाचा समावेश होत असून, गेल्या काही स्पर्धांपासून ती आपल्या खराब फॉर्मशी झगडत होती.

३२ वर्षीय शारापोव्हाने २००४ साली वयाच्या १७व्या वर्षी टेनिसविश्वातील सर्वात प्रतिष्ठेची विम्बल्डन स्पर्धा जिंकून क्रीडाविश्वाचे लक्ष वेधले होते. आपल्या निवृत्तीची घोषणा करताना शारापोव्हाने सांगितले की, ‘आतापर्यंत लोक तुला टेनिसमुळे ओळखत होते, पण आता या खेळाविना तू कशी जीवन जगशील? लहान असल्यापासून तू टेनिस कोर्टवर वावरलीस. टेनिसने तुला अनेक आनंदाचे क्षण, तसेच अश्रू दिले. हा असा खेळ होता, ज्यामध्ये तुला तुझा पूर्ण परिवार मिळाला. असंख्य चाहते मिळाले. तू तुझ्यामागे २८ वर्षांची कारकिर्द सोडून जात आहेस.’ एका मासिकातील लेखामध्ये शारापोव्हाने म्हटले की, ‘टेनिस, आता मी तुला गुडबाय म्हणते.’

शारापोव्हाने वयाच्या २०व्या वर्षी २००८ साली ऑस्ट्रेलियन ओपन जेतेपद पटकावले होते. यानंतर, तिने २०१२ आणि २०१४ साली फ्रेंच ओपन जेतेपदही उंचावले होते. कारकिर्दीत अनेक दुखापतींना सामोरे गेलेल्या शारापोव्हाने २००३ ते २०१५ पर्यंत प्रत्येक वर्षी किमान एक स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला आहे. विशेष म्हणजे, महिलांमध्ये अशी कामगिरी या आधी केवळ स्टेफी ग्राफ, मार्टिना नवरातिलोवा व ख्रिस एव्हर्ट यांनीच केली आहे.

याशिवाय, २०१२ साली लंडन येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये मारिया शारापोव्हाने एकेरीचे रौप्य पदक मिळविले आहे. कट्टर प्रतिस्पर्धी अमेरिकेची दिग्गज सेरेना विलियम्सविरुद्ध तिला पराभव पत्करावा लागला होता.

सचिनवरील वक्तव्यामुळे झाली होती टीका
दिग्गज क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला ओळखत नसल्याचे वक्तव्य केल्यानंतर, शारापोव्हावर जगभरातील क्रिकेटप्रेमींनी फैलावर घेतले होते. यावेळी तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. दखल घेण्याची बाब म्हणजे, शारापोव्हा २००५ ते २००८ सालादरम्यान इंटरनेटवर सर्वाधिक सर्च केली जाणारी ‘स्पोटर््स सेलिब्रेटी’ ठरली होती.

डोपिंगमुळे लागली उतरती कळा!
कारकिर्द ऐन भरात असताना उत्तेजक द्रव्य घेतल्याने शारापोव्हाच्या कारकिर्दीला उतरती कळा लागली. हा तिच्या कारकिर्दीतील टर्निंग पॉइंट ठरला. या प्रकरणी १५ वर्षांच्या बंदीची शिक्षा भोगल्यानंतर शारापोव्हाने २०१७ साली स्पर्धात्मक टेनिसमध्ये पुनरागमन केले. आॅस्टेÑलियन ओपनदरम्यान प्रतिबंधित असलेल्या मेल्डोनियम औषधाचे सेवन केल्याप्रकरणी शारापोव्हा दोषी आढळली होती.

Web Title: Five time Grand Slam winner Maria Sharapova announces her retirement from tennis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.