French Open 2018: सिमोना हालेप फ्रेंच ओपनची राणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2018 09:07 PM2018-06-09T21:07:04+5:302018-06-09T21:19:38+5:30
अंतिम फेरीत स्टिव्हन्सचा पराभव करत पटकावलं पहिलं ग्रँडस्लॅम जेतेपद
पॅरिस: रोमानियाच्या सिमोना हालेपनं फ्रेंच ओपनचं जेतेपद पटकावलं आहे. हालेपनं अंतिम फेरीत अमेरिकेच्या स्लोन स्टिव्हन्सचा 3-6, 6-4, 6-1 असा पराभव केला. हालेपचं हे पहिलंवहिलं ग्रँडस्लॅम जेतेपद ठरलं आहे. याआधी हालेपनं तीनवेळा ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र तिला जेतेपदानं हुलकावणी दिली होती. हा ग्रँडस्लॅम जेतेपदांचा दुष्काळ हालेपनं आज संपवला. अंतिम फेरीत पहिला सेट गमावूनही हालेपनं दमदार पुनरागमन करत स्टिव्हनचा पराभव केला.
पहिल्यावहिल्या ग्रँडस्लॅम जेतेपदासाठी खेळणारी सिमोना हालेप आणि दुसऱ्या विजेतेपदासाठी कोर्टवर उतरलेली स्लोन स्टिव्हन्स असा हा सामना चांगलाच रंगला. स्टिव्हन्सनं पहिल्या सेटमध्ये जोरदार खेळ केला. त्यामुळे हालेपची चांगलीच दमछाक झाली. पहिला सेट 3-6 असा गमावल्यावर हालेपनं दुसऱ्या सेटमध्ये दमदार खेळ केला. हालेपनं दुसरा सेट 6-4 असा जिंकत सामना बरोबरीत आणला. हा सेट जिंकल्यानं तिचा आत्मविश्वास चांगलाच उंचावला. याचा परिणाम तिसऱ्या सेटमध्ये पाहायला मिळाला. तिसऱ्या आणि अंतिम फेरीत हालेपनं झंझावाती खेळ करत स्टिव्हन्सला प्रतिकाराची संधी दिली नाही. या सेटमध्ये हालेपनं 6-1 अशी बाजी मारत पहिल्यावहिल्या ग्रँडस्लॅम जेतेपदाला गवसणी घातली.