फ्रेंच ओपन : नदालविरुद्ध जोकोविच सामन्याची उत्सुकता, हायव्होल्टेज सामन्याकडे लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 05:21 AM2021-06-11T05:21:59+5:302021-06-11T05:23:05+5:30
French Open: नदाल विक्रमी १४ व्या फ्रेंच ओपनसह विश्वविक्रमी २१ व्या ग्रँडस्लॅम जेतेपदासाठी प्रयत्न करत असून जोकोविच आपला विजयी धडाका कायम राखण्यास पूर्ण जोशात खेळेल.
पॅरिस : सर्वाधिक ग्रँडस्लॅम विजेता टेनिसपटू असा मान मिळवण्यापासून केवळ एक विजेतेपद दूर असलेला स्पेनचा राफेल नदाल आणि जागतिक क्रमवारीत अव्वल असलेला सर्बियाचा नोव्हाक जोकोविच हे फ्रेंच ओपनच्या उपांत्य फेरीत एकमेकांविरुद्ध भिडतील. कोरोना महामारीदरम्यान टेनिसप्रेमींना या निमित्ताने मोठ्या कालावधीनंतर एका हायव्होल्टेज लढतीची मेजवानी मिळेल.
नदाल विक्रमी १४ व्या फ्रेंच ओपनसह विश्वविक्रमी २१ व्या ग्रँडस्लॅम जेतेपदासाठी प्रयत्न करत असून जोकोविच आपला विजयी धडाका कायम राखण्यास पूर्ण जोशात खेळेल. प्रेक्षकांच्या अनुपस्थितीमध्ये झालेल्या रोमांचक सामन्यात जोकोविचने नवव्या मानांकित मॅटियो बेरेटिनी याचा ६-३, ६-२, ६-७ (५-७), ७-५ असा पराभव केला. या शानदार विजयानंतर जोकोविचला आता नदालच्या तगड्या आव्हानाला सामोरे जायचे आहे.
- नदाल फ्रेंच ओपनमध्ये १४ व्यांदा, तर जोकोविच अकराव्यांदा उपांत्य फेरीत पोहचला आहे.
- ग्रँडस्लॅम स्पर्धा इतिहासात नदालने ३५ व्यांदा, तर जोकोविचने ४० व्यांदा उपांत्य फेरी गाठली.
- नदाल आणि रॉजर फेडरर प्रत्येकी २० ग्रँडस्लॅम जेतेपदांसह अव्वल असून जोकोविच १८ ग्रँडस्लॅम जेतेपदांसह दुसऱ्या स्थानी आहे.
- नदाल आणि जोकोविच ५८ व्यांदा एकमेकांविरुद्ध खेळतील. दोघांमध्ये जोकोविच २९-२८ असा एका विजयाने आघाडीवर आहे.