फ्रेंच ओपन टेनिस; अल्काराझचे पहिले ‘फ्रेंच’ जेतेपद
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 05:54 AM2024-06-10T05:54:05+5:302024-06-10T05:54:58+5:30
French Open 2024; पाच सेटपर्यंत रंगलेल्या अत्यंत अटीतटीच्या अंतिम सामन्यात स्पेनच्या कार्लोस अल्काराझने जर्मनीच्या अलेक्झांद्र झ्वेरेव याचे कडवे आव्हान परतावले. यासह अल्काराझने पहिल्यांदाच फ्रेंच ओपन टेनिस ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावले.
पॅरिस - पाच सेटपर्यंत रंगलेल्या अत्यंत अटीतटीच्या अंतिम सामन्यात स्पेनच्या कार्लोस अल्काराझने जर्मनीच्या अलेक्झांद्र झ्वेरेव याचे कडवे आव्हान परतावले. यासह अल्काराझने पहिल्यांदाच फ्रेंच ओपन टेनिस ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावले. दुसरीकडे, अमेरिकेच्या कोको गाॅफने झेक प्रजासत्ताकच्या कॅटरिना सिनियाकोव्हा हिच्या साथीत पहिले दुहेरीचे ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले.
पुरुष एकेरीच्या ४ तास १९ मिनिटांपर्यंत रंगलेल्या रोमांचक सामन्यात अल्काराझ आणि झ्वेरेव यांनी अनेकदा आपापल्या सर्व्हिस गमावल्या. पहिला सेट जिंकून अल्काराझने आघाडी घेतल्यानंतर झ्वेरेवने शानदार पुनरागमन करत सलग दोन सेट जिंकून २-१ अशी आघाडी मिळवली. परंतु, येथून जोरदार प्रत्युत्तर देताना अल्काराझने सलग दोन सेट जिंकताना ६-३, २-६, ५-७, ६-१, ६-२ अशी बाजी मारली. यूएस ओपन, विम्बल्डन या स्पर्धांनंतरचे हे अल्काराझचे तिसरे ग्रँडस्लॅम जेतेपद ठरले.
महिला दुहेरीत, गाॅफ-सिनियाकोव्हा यांनी जॅस्मिन पाओलिनी आणि सारा इरानी या इटलीच्या जोडीला सरळ सेटमध्ये ७-६, ६-३ असे पराभूत करत सहजपणे जेतेपद पटकावले. गाॅफने तिसऱ्यांदा ग्रँडस्लॅम महिला दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. याआधी तिला २०२२ मध्ये फ्रेंच ओपनमध्ये आणि २०२१मध्ये अमेरिकन ओपन स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.