जोकोविचला पाच सेटपर्यंत करावा लागला संघर्ष, रॉजर फेडररच्या विक्रमाशी केली बरोबरी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2024 07:06 AM2024-06-03T07:06:53+5:302024-06-03T07:07:09+5:30
French Open Tennis : चार तास ३० मिनिटांपर्यंत रंगलेल्या या सामन्यात बाजी मारत जोकोविचने स्वित्झर्लंडचा माजी दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर याच्या ३६९ ग्रँडस्लॅम सामने जिंकण्याच्या विक्रमाशी बरोबरीही केली.
पॅरिस : जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या सर्बियाचा टेनिसपटू नोव्हाक जोकोविच याने फ्रेंच ओपन टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धेत चौथी फेरी गाठली. मात्र, यासाठी त्याला इटलीच्या २२ वर्षीय लोरेंजो मुसेट्टीविरुद्ध तब्बल पाच सेटपर्यंत झुंजावे लागले.
चार तास ३० मिनिटांपर्यंत रंगलेल्या या सामन्यात बाजी मारत जोकोविचने स्वित्झर्लंडचा माजी दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर याच्या ३६९ ग्रँडस्लॅम सामने जिंकण्याच्या विक्रमाशी बरोबरीही केली. सोमवारी जोकोचा सामना अर्जेंटिनाच्या २३ वर्षीय फ्रान्सिस सेरुंडोलोविरुद्ध होईल. हा सामना जिंकून जोको फेडररचा विक्रम मोडेल.
मुसेट्टीने पहिला सेट गमावल्यानंतर सलग दोन सेट जिंकत जोकोला दडपणात आणले. मात्र, जोकोने आपला सर्व अनुभव पणास लावला आणि मुसेट्टीचा ७-५, ६-७(६-८), २-६, ६-३, ६-० असा पराभव केला. पाचव्या सेटमध्ये जोकोने तुफान खेळ करताना मुसेट्टीला एकही गेम जिंकू दिला नाही. नॉर्वेच्या कॅस्पर रुडनेही चौथ्या फेरीत प्रवेश करताना अर्जेंटिनाच्या टॉमस मार्टिन एचेव्हरीचा ६-४, १-६, ६-२, ६-२ असा पराभव केला.
बोपन्नाची विजयी सुरुवात
पुरुष दुहेरीत भारताच्या रोहन बोपन्नाने ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू एबडेन याच्यासह खेळताना विजयी सलामी दिली. बोपन्ना-एबडेन या द्वितीय मानांकित जोडीने मार्सेलो झोर्मन-ऑर्लेंडो लुझ या ब्राझिलियन जोडीचा ७-५, ४-६, ६-४ असा पराभव केला. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या सामन्यात बोपन्ना-एबडेन यांना २ तास ७ मिनिटे झुंजावे लागले.