दिग्गज रॉजर फेडररचा तुफानी विजय
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2019 04:19 AM2019-11-16T04:19:44+5:302019-11-16T04:19:59+5:30
एटीपी फायनल्स टेनिस स्पर्धेतील ‘हायव्होल्टेज’ सामन्यात रॉजर फेडररने विम्बल्डन अंतिम सामन्यातील पराभवाचा वचपा काढत नोव्हाक जोकोविचला स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला.
लंडन : संपूर्ण टेनिसविश्वाचे लक्ष लागून राहिलेल्या एटीपी फायनल्स टेनिस स्पर्धेतील ‘हायव्होल्टेज’ सामन्यात रॉजर फेडररने विम्बल्डन अंतिम सामन्यातील पराभवाचा वचपा काढत नोव्हाक जोकोविचला स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला. या शानदार विजयासह फेडररने एटीपी फायनल्स स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली.
‘ओ टू’ अरेना स्टेडियममध्ये झालेल्या या स्पर्धेत दोन्ही खेळाडूंना उपांत्य फेरीसाठी विजय आवश्यक होता. यंदाच्या विम्बल्डन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जोकोविचने फेडररला पाच तास रंगलेल्या अत्यंत रोमांचक सामन्यात नमविले होते. त्यामुळे जोकोविचचे पारडे या सामन्यात वरचढ होते. मात्र वेगळाच निर्धार केलेल्या फेडररच्या चपळ खेळापुढे जोकोविचचा काहीच निभाव लागला नाही. सरळ दोन सेटमध्ये बाजी मारताना फेडररने जोकोविचचा ६-४, ६-३ असा धुव्वा उडवला. पहिल्या सेटमध्ये फेडररला जोकोविचकडून तुल्यबळ लढत मिळाली. मात्र दुसऱ्या सेटमध्ये फेडररचा खेळ जबरदस्त होता. त्याने या वेळी सलग तीन सेट जिंकत बाजी मारली आणि जोकोविचचे आव्हानही संपुष्टात आणले.
या पराभवासह जोकोविचचे पुन्हा एकदा जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळविण्याचे स्वप्नही धुळीस मिळाले. या स्पर्धेचे जेतेपद पटकावण्यात जोकोविचला यश आले असते तर तो जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी आला असता. त्याचप्रमाणे जोकोने या वेळी फेडररच्या सर्वाधिक सहा एटीपी फायनल्स जेतेपदांच्या विश्वविक्रमाची बरोबरीही केली असती. दुसरीकडे, अत्यंत रोमांचक सामन्यात स्पेनच्या दिग्गज राफेल नदालने ग्रीसच्या स्टेफानोस सिटसिपासचा ६-७, ६-४, ७-५ असा पराभव केला.
फेडररने एटीपी फायनल्स स्पर्धेत विक्रमी १७व्यांदा सहभाग घेतला असून त्याने १६व्यांदा या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. बियॉर्न बॉर्ग गटातील पहिल्या लढतीत डॉमनिक थिएमकडून अनपेक्षित पराभव पत्करावा लागल्यानंतर फेडररने आपला उच्च दर्जाचा खेळ सादर करत सलग दोन विजयांसह उपांत्य फेरी गाठली. जोकोविचलाही याआधी धक्का देत थिएम या स्पर्धेत जायंट किलर ठरला होता.
उपांत्य सामन्यात फेडरर आंद्रे आगासी गटातील अव्वल खेळाडूविरुद्ध भिडेल. आगासी गटातून स्टेफानोस सिटसिपास याने आधीच उपांत्य फेरी गाठली असून दुसºया स्थानासाठी राफेल नदाल, गतविजेता अलेक्झांडर झ्वेरेव आणि डेनिल मेदवेदेव यांच्यात चुरस आहे.