कजाखस्तानकडून भारत पराभूत, भारत वर्ल्ड ग्रुप प्लेआॅफ शर्यतीतून बाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 03:31 AM2018-02-09T03:31:28+5:302018-02-09T03:31:44+5:30
करमन कौर थांडी हिच्या पहिल्या एकेरीतील पराभवानंतर अंकिता रैना हिने पुन्हा एकदा शानदार कामगिरी करताना फेड कप एशिया ओशियाना टेनिस स्पर्धेतील ग्रुप एक लढतीत भारताच्या आशा उंचावल्या
नवी दिल्ली : करमन कौर थांडी हिच्या पहिल्या एकेरीतील पराभवानंतर अंकिता रैना हिने पुन्हा एकदा शानदार कामगिरी करताना फेड कप एशिया ओशियाना टेनिस स्पर्धेतील ग्रुप एक लढतीत भारताच्या आशा उंचावल्या; परंतु दुहेरीतील पराभवानंतर यजमान संघाला कजाखस्तानकडून हार मानावी लागली. १९ वर्षीय करमन हिला विश्व रँकिंगमध्ये ५५ व्या स्थानावर असणाºया जरिना दियास हिच्याकडून ६-३, ६-२ असा पराभव पत्करावा लागला. त्यानंतर अंकिता हिने युलिना पुतिनत्सेवा हिच्यावर ६-३, १-६, ६-४ असा विजय मिळवत भारताला बरोबरी साधून दिली होती.
निर्णायक दुहेरीच्या लढतीत भारताच्या अंकिता आणि प्रार्थना ठोंबरे यांना दियास व पुतिनत्सेवा यांनी ६-0, ६-४ असे पराभूत केले. प्रार्थनाने गेल्या काही काळापासून दुहेरीवर लक्ष केंद्रित केले आहे; परंतु सलग दुसºया दिवशी ती भारतासाठी निर्णायक लढती जिंकू शकली नाही. या पराभवामुळे भारत विश्व ग्रुप प्लेआॅफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. अ गटातून चीन अथवा कजाखस्तानचा सामना प्लेआॅफमध्ये ब गटातील विजेत्या संघाविरुद्ध होईल. ही लढत एप्रिलमध्ये खेळवली जाईल. भारत एशिया ओशियानात स्थान मिळवण्यासाठी हाँगकाँगविरुद्ध दोन हात करील. बुधवारी झालेल्या लढतीत जगातील १२0 व्या क्रमांकावरील खेळाडू लिन झू हिला नमवणाºया अंकिताने आज पुन्हा या कामगिरीची पुनरावृत्ती करताना जागतिक क्रमवारीतील ८१ व्या स्थानावरील खेळाडूला पराभूत केले.