इनडोअरमुळे होणार रोमहर्षक सामने, भारतीय खेळाडूंची कामगिरी चांगली होईल - झीशान अली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 12:48 AM2017-09-14T00:48:46+5:302017-09-14T00:49:11+5:30
एडमंटन येथे १५ सप्टेंबरपासून सुरूहोणारे डेव्हिस चषक स्पर्धेतील सामने उच्च दर्जाचे व रोमहर्षक होतील, असे मत भारताचे डेव्हिस चषक स्पर्धेतील प्रशिक्षक झीशान अली यांनी व्यक्त केले. हे सामने इनडोअर स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आल्यामुळे ऊन व वा-याचा त्रास खेळाडूंना होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
नवी दिल्ली : एडमंटन येथे १५ सप्टेंबरपासून सुरूहोणारे डेव्हिस चषक स्पर्धेतील सामने उच्च दर्जाचे व रोमहर्षक होतील, असे मत भारताचे डेव्हिस चषक स्पर्धेतील प्रशिक्षक झीशान अली यांनी व्यक्त केले. हे सामने इनडोअर स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आल्यामुळे ऊन व वा-याचा त्रास खेळाडूंना होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
झीशान म्हणाले, ‘या स्पर्धेत भारतीय खेळाडूंची कामगिरी चांगली असेल. भारताच्या युकी भांबरीला इनडोअरमध्ये खेळणे आवडते. मागील वेळी आम्ही न्यूझीलंडविरुद्ध खूपच चांगली कामगिरी केली होती. इनडोअरमुळे आमचे काही नुकसान होईल, असे मला वाटत नाही, त्याचबरोबर त्यांनाही याचा खास फायदा होणार नाही.’
या स्पर्धेत भारताला कॅनडाच्या डेनिस शापोवलोव व दुहेरीतील तज्ज्ञ खेळाडू डेनियल नेस्टर यांचे कडवे आव्हान असणार आहे. जागतिक क्रमवारीत ११व्या स्थानी असलेला मिलोस राओनिच दुखापतीमुळे या लढतीला मुकणार आहे. झीशान म्हणाले, ‘शापोवलोव खूपच चांगल्या फॉर्ममध्ये असून, त्याच्याविरुद्धची लढत ही सोपी असणार नाही. तरीही आम्हाला चार वर्षांत ही सर्वांत चांगली संधी आहे.’
माजी कर्णधार एस. पी. मिश्रा यांनीही भारताला यावर्षी मोठी संधी असल्याचे म्हटले आहे. सोमदेव देवबर्मन याच्या नेतृत्वाखाली बंडखोरी करीत आपले पद सोडणा-या मिश्रा यांना आपल्या अनुपस्थितीत संघ एकदाही प्ले आॅफच्या पुढे गेला नाही याचे आश्चर्य वाटते.
ते म्हणाले, ‘मी २०१० व २०११ मध्ये भारताला जागतिक गटात नेले होते; मात्र त्या वेळीही भारताने अपेक्षित कामगिरी केली नसल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, आता कोणी तर या संघाला जागतिक गटात न्यायला हवे.’ मिश्रा म्हणाले, ‘मागील काही वर्षांच्या तुलनेत आपल्याकडे चांगले खेळाडू नाहीत. कॅनडाकडे चांगल्या रॅँकिंगचे खेळाडू आहेत.
मात्र, आपली तयारी यावेळी चांगली झाली असल्याचे त्यांनी सांगितले. युकी भांबरी व रामकुमार सध्या चांगली कामगिरी करीत आहेत, तर रोहनने यापूर्वी नेस्टरला पराभूत केले होते. साकेतही चांगल्या फॉर्ममध्ये असल्याने या वेळी रोमहर्षक सामने होतील.’
झीशान म्हणाले, ‘इनडोअर स्टेडियममध्ये खेळताना बाहेरच्या कोणत्याही गोष्टींचा परिणाम आपल्या खेळावर होत नाही. त्यामुळे आपल्या खेळाचा स्तर सुमारे २० टक्क्यांपर्यंत वाढतो.’ भारताकडे गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत जागतिक गटात स्थान पटकाविण्याची आता मोठी संधी आहे, असे झीशान यांना वाटते. भारताला मागील तीन वर्षांत सर्बिया, झेक गणराज्य व स्पेनकडून पराभव पत्करावा लागला होता.