Aishwarya Jadhav, Wimbledon 2022 : अखेरच्या सामन्यात ऐश्वर्याची टायब्रेकरपर्यंत झुंज; न्यूझीलंडच्या ऐशी दॅस कडून पराभूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2022 10:18 PM2022-07-10T22:18:07+5:302022-07-10T22:18:27+5:30
कोल्हापूर : कोल्हापूरच्या ऐश्वर्या जाधव हिचा चौदा वर्षांखालील ज्युनिअर विम्बल्डन स्पर्धेत दुसऱ्या दिवशी शुक्रवारी झालेल्या तिसऱ्या सामन्यांत न्यूझीलंडच्या ऐशी दॅस हिच्याकडून ३-६, ६-२, ५-१० असा पराभव झाला.
कोल्हापूर : कोल्हापूरच्या ऐश्वर्या जाधव हिचा चौदा वर्षांखालील ज्युनिअर विम्बल्डन स्पर्धेत दुसऱ्या दिवशी शुक्रवारी झालेल्या तिसऱ्या सामन्यांत न्यूझीलंडच्या ऐशी दॅस हिच्याकडून ३-६, ६-२, ५-१० असा पराभव झाला. मात्र, तिने अखेरचा सेट टायब्रेकरपर्यंत नेला. तिची कडवी झुंज उपस्थितांचे लक्ष वेधून घेणारी ठरली.
विम्बल्डन नगरीतील ऑल इंग्लंड क्लबच्या मैदानात सुरू असलेल्या या स्पर्धेत गुरुवारी उशिरा रात्री झालेल्या दुसऱ्या सामन्यांत ग्रेट ब्रिटनच्या मिका स्वालेवीक हिच्यासोबत झालेल्या सामन्यात ती ६-४, ६-१ अशी सरळ सेटमध्ये हरली, तर शुक्रवारी सकाळी झालेल्या तिसऱ्या सामन्यांत तिने न्यूझीलंडच्या ऐशी दॅस हिला विजयासाठी चांगलेच झुंजविले. या सामन्यात पहिला सेट ऐश्वर्या हरली.
त्यानंतर तिने पुनरागमन करीत दुसऱ्या सेटमध्ये ६-२ अशी बरोबरी केली. त्यानंतर दोघींचेही ५-५ असे समान गुण झाले. त्यामुळे टेनिसमधील नव्या नियमानुसार सामना टाय झाला. तिसऱ्या सेटसाठी टायब्रेकरचा अवलंब करण्यात आला. त्यात अखेरच्या क्षणी प्रतिस्पर्धी न्यूझीलंडच्या ऐशी दॅस हिने जोरदार फटकेबाजी करीत हा सामना ५-१० असा जिंकला. सलग तीन पराभवामुळे ऐश्वर्याचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. आता तिचे पुढील लक्ष्य फ्रान्स व जर्मनी येथे होणाऱ्या ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा कार्यक्रमावर आहे. येत्या दोन दिवसांत ती भारतात परतणार असून पुन्हा १७ जुलैला ती फ्रान्स स्पर्धेसाठी रवाना होणार आहे. तिला या कार्यक्रमांतर्गत पाच आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याची संधी मिळाली होती. मात्र, विम्बल्डन स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाल्यामुळे तीन सामने खेळता आले नाहीत. उर्वरित दोन सामने ती आता खेळणार आहे.
मी पुन्हा येईन
टेनिस पंढरी विम्बल्डनमध्ये प्रथमच मला संधी मिळाली. ग्रासकोर्टवर खेळण्याचा अनुभव मला नव्हता. तरीसुद्धा मी अखेरच्या सामन्यात या स्पर्धेत कसे खेळायचे हे मला समजले. अखेरच्या सामन्यात बरोबरीनंतर ९-३ अशी स्थिती होती. मी त्यात ९-५ पर्यंत चांगली कामगिरी केली. माझी कामगिरी माझ्या दृष्टीने सरस झाली. पुढील वेळेस विम्बल्डननगरीत मी पुन्हा येईन आणि चांगला खेळ करून दाखवीन, अशी प्रतिक्रिया ऐश्वर्याने ‘लोकमत’शी बोलताना दिली.