नदालचा पुन्हा दबदबा, ३ वर्षांच्या कालावधीनंतर पुन्हा एकदा अव्वल स्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 05:20 AM2017-08-22T05:20:00+5:302017-08-22T05:20:00+5:30

स्पेनचा दिग्गज टेनिसपटू राफेल नदाल याने पुन्हा एकदा एटीपी क्रमवारीत आपला दबदबा राखताना तब्बल तीन वर्षांच्या कालावधीनंतर अव्वल स्थान काबीज केले.

Nadal again dominates, again in the top spot after 3 years | नदालचा पुन्हा दबदबा, ३ वर्षांच्या कालावधीनंतर पुन्हा एकदा अव्वल स्थानी

नदालचा पुन्हा दबदबा, ३ वर्षांच्या कालावधीनंतर पुन्हा एकदा अव्वल स्थानी

पॅरिस : स्पेनचा दिग्गज टेनिसपटू राफेल नदाल याने पुन्हा एकदा एटीपी क्रमवारीत आपला दबदबा राखताना तब्बल तीन वर्षांच्या कालावधीनंतर अव्वल स्थान काबीज केले. विशेष म्हणजे, नदालचे अव्वल स्थान एक आठवड्यापूर्वीच निश्चित झाले होते. याआधी जुलै २०१४ मध्ये नदाल क्रमवारीत अव्वल स्थानी होता.
नदालने ब्रिटनचा स्टार खेळाडू अँडी मरेला पिछाडीवर टाकत अव्वल स्थान पटकावले. मरेला एका स्थानाचे नुकसान झाले असून तो द्वितीय स्थानी आहे. तसेच, स्वित्झर्लंडचा दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर याने तिसरे स्थान कायम राखले असून त्याचाच देशबांधव स्टॅनिस्लास वावरिंका आणि सर्बियाचा नोव्हाक जोकोविच हे अनुक्रमे चौथ्या व पाचव्या स्थानी विराजमान आहेत. कंबरेखालच्या दुखापतीमुळे सिनसिनाटी स्पर्धेतून माघार घेतल्याने मरेला क्रमवारीमध्ये नुकसान झाले. याचा फायदा नदालला झाला आणि त्याने तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बाजी मारली. याआधी २००८ मध्ये पहिल्यांदा नदाल क्रमवारीत अव्वल आला होता व तब्बल १४१ आठवडे त्याने आपले अग्रस्थान कायम राखले होते. यानंतर दुखापतींचा सामना करावा लागलेल्या नदालच्या कामगिरीत सातत्याचा अभाव राहिला व पुन्हा कधी अग्रस्थान मिळवण्यात त्याला यश मिळेल, याची टेनिसप्रेमींना आशाही नव्हती. (वृत्तसंस्था)

रामनाथन अव्वल भारतीय
भारताच्या रामकुमार रामनाथनने आपल्या क्रमवारीत सुधारणा करत अव्वल भारतीय खेळाडू बनण्याचा मान मिळवला. लिएंडर पेस आणि सानिया मिर्झा यांना आपापल्या क्रमवारीमध्ये नुकसान सोसावे लागले. रामनाथनने तब्बल २४ स्थानांची मोठी झेप घेताना विश्वक्रमवारीत १५६ वे स्थान मिळवले. तो युकी भांबरीच्या तुलनेत दोन स्थानांनी पुढे आहे. तसेच, पेसला दोन स्थानांचे नुकसान झाले असून तो ६४ व्या क्रमांकावर आहे. सानियाचीही एका स्थानाने घसरण झाली असून ती नव्या क्रमवारीत ८ व्या स्थानी आली आहे. तसेच, रोहन बोपन्नाने आपले १७ वे स्थान कायम राखण्यात यश मिळवले.

Web Title: Nadal again dominates, again in the top spot after 3 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.