नदाल, मेदवेदेव, बार्टी उपांत्यपूर्व फेरीत, ऑस्ट्रेलियन ओपन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2021 06:33 AM2021-02-16T06:33:15+5:302021-02-16T06:33:47+5:30
Australian Open : चौथ्या मानांकित मेदवेदेवने प्रथमच ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले. त्याने अमेरिकेच्या १९२ व्या मानांकित मॅकेंजी मॅकडोनाल्डचा ६-४, ६-२, ६-३ ने पराभव केला.
मेलबोर्न : जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या स्पेनच्या राफेल नदालने सोमवारी १३ व्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनच्या क्वार्टर फायनलमध्ये स्थान मिळविले. आपले विक्रमी २१ वे ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावण्यास उत्सुक असलेल्या नदालने जागतिक क्रमवारीत १६व्या स्थानी असलेल्या फाबियो फोगनिनीचा ६-३, ६-४, ६-२ ने पराभव केला. नदाल व रॉजर फेडरर यांच्या नावावर प्रत्येकी २० ग्रँडस्लॅम जेतेपदाची नोंद आहे.
चौथ्या मानांकित मेदवेदेवने प्रथमच ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले. त्याने अमेरिकेच्या १९२ व्या मानांकित मॅकेंजी मॅकडोनाल्डचा ६-४, ६-२, ६-३ ने पराभव केला. यूएस ओपन २०१९ चा विजेता मेदवेदेवची यानंतरची लढत मायदेशातील सहकारी आंद्रे रुबलेवसोबत होईल. २२ वे मानांकन प्राप्त खेळाडू कॅस्पर रूडने दुखापतीमुळे माघार घेतली. त्यामुळे रुबलेवचा उपांत्यपूर्व फेरीचा मार्ग प्रशस्त झाला. महिला एकेरीत जेसिका पेगुला, जनिफर ब्राडी व अव्वल मानांकित एश बार्टी यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश निश्चित केला.
अमेरिकेच्या २६ व्या मानांकित पेगुलाने युक्रेनच्या पाचव्या मानांकित इलिना स्वितलोनाचा ६-४, ३-६, ६-३ ने पराभव करीत धक्कादायक निकाल नोंदवला. तिने प्रथमच अव्वल १० मध्ये समावेश असलेल्या खेळाडूविरुद्ध विजय मिळवला आहे. पेगुलाला यानंतर मायदेशातील सहकारी ब्राडीच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल.पेनसेलवेनियाची रहिवासी २५ वर्षीय ब्राडीने क्रोएशियाच्या डोना वेकिचचा ६-१, ७-५ ने पराभव केला.
अव्वल मानांकित एश बार्टीने शेल्बी रोजर्सविरुद्ध ६-३, ६-४ ने सरशी साधत सलग तिसऱ्यावर्षी उपांत्यपूर्व फेरीत स्थान निश्चित केले. गेल्यावर्षी उपांत्य फेरीत सोफिया केनिनविरुद्ध पराभूत झालेल्या बार्टीला उपांत्यपूर्व फेरीत कॅरोलिना मुचोवाच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. जागतिक क्रमवारीत २५ व्या स्थानी असलेल्या मुचोवाने उपउपांत्यपूर्व फेरीत १८ व्या मानांकित एलिसे मार्टेसचा ७-६, ७-५ ने पराभव केला. ती ग्रँडस्लॅममध्ये दुसरी उपांत्यपूर्व फेरी गाठण्यात यशस्वी ठरली.